भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा शोधमोहीम सुरू; दुपारचे सत्र रद्द
नाशिक : भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकासह गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात घनदाट झाडी व उंच गवत असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असून ड्रोनच्या साहाय्याने व्यापक तपासणी सुरू आहे.
शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाशी चर्चा करून दुपारचे सत्र तात्काळ रद्द करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता स्कूल व्हॅनच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वनविभागाचे अधिकारी, पोलीस आणि शाळा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींबाबत लवकरच अद्ययावत माहिती देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.