तिवंधा चौकातील वाड्याची भिंत कोसळली; नागरिक भयभीत

जुने नाशिक : वार्ताहर
शहरात शनिवारपासून कोसळणार्‍या जोरदार पावसामुळे तिवंधा चौक परिसरातील एका जीर्णावस्थेतील वाड्याची भिंत काल (दि.28) पहाटे कोसळली. ही घटना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
दरम्यान, या वाड्याची भिंत जीर्णावस्थेत असल्याने व सतत कोसळणार्‍या पावसामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मनपाने तातडीने या जीर्ण वाड्याचे पाडकाम करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी मागणी येथील नागरिक जयश्री परदेशी यांनी केली आहे. भिंत कोसळल्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पथकाने पाहणी करून परिसर सील करून, वाड्याचा धोकादायक भाग काढण्यात आला.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व बांधकाम विभागाच्या पथकाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. वारंवार तक्रारी करूनही मनपाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार जयश्री प्रवीण परदेशी यांनी मनपाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *