खचू नका, सरकार आपल्या पाठीशी

आमदार कांदे : नांदगावला अतिवृष्टीबाधित पिकांची पाहणी

नांदगाव : प्रतिनिधी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत. अतिवृष्टीने बाधित भागाचा आ. सुहास कांंदे यांनी सोमवारी (दि. 29) पाहणी दौरा करत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकर्‍यांना त्यांनी दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीचा सामना करा. खचून जाऊ नका. मी कुटुंबप्रमुख या नात्याने, तसेच सरकारदेखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आमदार सुहास कांदे यांनी शेतकर्‍यांना सांगितले.
नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने कांदा, मका, भुईमूग, कपाशी व कांदारोप यांसह पपई, केळी, डाळिंब आदींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
आमदार कांदे यांनी तालुक्यातील साकोरे, तळवाडे, वेहेळगाव, कळमधरी, मळगाव, बोराळे, आमोदे, पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना आमदार कांदे यांनी दिले. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी संबंधितांनी लक्ष घालावे, असे निर्देश आमदार कांदे यांनी दिले. या पाहणी दौर्‍यात आमदार कांदे यांच्यासह नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाणे, माजी आमदार संजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खताळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, माजी सभापती विलासभाऊ आहेर, तेज कवडे, साकोरा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य रमेश बोरसे बोराळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र पवार, आमोदे ग्रामपंचायतीचे विठ्ठलभाऊ पगार, प्रशांत पगार, ज्ञानेश्वर निकम, उज्ज्वल सोळंके व आमोदे, बोराळे, बेळगाव, मळगाव, मंगळणे, कळमदरी येथील शेतकरी उपस्थित होते.

नुकसानभरपाईबाबत निवेदने

अतिवृष्टीने बाधित पिकांच्या पाहणीसाठी आलेल्या आमदार सुहास कांदे, तहसीलदार सुनील सैंदाणे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खताळे तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे यांना नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी बोराळेचे माजी सरपंच राजेंद्र पवार, आमोदेचे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पगार, मळगावचे उपसरपंच नितीन पगार, वेहेळगावच्या सरपंच वर्षा भाबड, हरिदास पाटील यांच्यासह अनेक ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी केली.

नांदगाव मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, शेतकर्‍यांनी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा. खचून जाऊ नये. मी व माझे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनातर्फे लवकरच मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करेन.
-सुहास कांदे, आमदार, नांदगाव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *