ग्रामस्थांची वन विभागाकडे पिंजर्याची मागणी
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
संसरी गावात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु असून त्यामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात तसेच नागरी भागातही बिबट्याचे वावर दिसत असून याच बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला होता.
शेवगेदारणा रोडवरील श्याम गोडसे यांच्या पोल्ट्री फार्मवरही बिबट्याने हल्ला चढवला होता. या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत वारंवार वन विभागास कळविण्यात आले असून लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतामध्ये काम करणारे शेतकरी, कामगार तसेच शाळाकॉलेजला जाणारी लहान मुले यांच्यावर धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे संसरी ग्रामपंचायतच्या वतीने गावात तातडीने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात
आली आहे.
या मागणीस माजी सरपंच विनोद गोडसे, संजय गोडसे, राजेश गोडसे, शेखर गोडसे, संतोष गोडसे, प्रशांत कोकणे, धनश्री म्हैसधुणे, शैला गोडसे, विजय गोडसे, सुनील गोडसे, दिलीप गोडसे व श्याम गोडसे आदींनी पाठिंबा दर्शवला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन वन विभागाला करण्यात आले आहे.