पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणार्यांविरुद्ध पिंपळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या कारवाईत शंभर गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत नऊ लाख 34 हजार 600 रुपये आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सिद्धार्थनगर परिसरात सापळा रचला. संशयित पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर आढळले.
पोलिसांच्या तपासणीत पिकअप वाहनातून प्रत्येकी 14.2 किलो वजनाचे शंभर घरगुती गॅस सिलिंडर वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी गॅस सिलिंडर व पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण नऊ लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, पोलीस कर्मचारी विकास वाळुंज, योगेश देशमुख आणि नितीन गाढवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
100 gas cylinders seized in Pimpalgaon.