शत-प्रतिशत प्रभाग समस्यांनी ग्रासलेलाच!

लक्ष्यवेध : प्रभाग-23

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांच्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. सन 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा व रूपाली निकुळे यांना विजयाचा मान मिळाला होता. चारही भाजपा नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात काही ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा, पथदीप, भुयारी गटार व मूलभूत सुविधा पुरविण्याचे प्रयत्न केले असले, तरी प्रभागातील अनेक भागांत अद्याप बिकटच स्थिती आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या कचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहतूक, पथदीप बिघाड, सायकल ट्रॅकची ढासळलेली अवस्था, सार्वजनिक शौचालयांची कमतरता, तसेच उद्यानांच्या देखभालीचा प्रश्न आजही मार्गी लागलेला नाही.
चिमुकल्यांची खेळणी तुटकीफुटकी होऊन धोकादायक झाली आहे. प्रभागातील रस्तेदुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, पाइपलाइनचे जुने झालेले जाळे, तसेच जॉगिंग ट्रॅकची सुविधा दयनीय आहे. यात स्प्रिंकल खराब अवस्थेत असून, जागोजागी गवत वाढले आहे. शौचालयांची व्यवस्था ढासळलेली आहे. अशा अनेक तक्रारींसाठी नागरिकांना थेट महानगरपालिकेच्या दारात जावे लागते. स्थानिक नगरसेवकांकडून अपेक्षित पातळीवर समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही मतदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.
माजी महापौरांचा प्रभाग, तरीही क्षुल्लक प्रश्न कायम राहिले असून, मागील पंचवार्षिक कार्यकाळात या प्रभागाला महापौर लाभले होते. मात्र, महापौरांचा प्रभाग असूनदेखील मूलभूत समस्या सुटल्या नाहीत, असे स्पष्टपणे नागरिक सांगतात. पथदीप चालू न होणे, सांडपाणी रस्त्यावर वाहणे, कचर्‍याचे ढीग, जीर्ण अवस्थेतील सार्वजनिक सुविधा हे प्रश्न महापौर कार्यकाळातही बदलले नाहीत, अशी टीका होत आहे.
प्रभाग अद्याप समस्यांच्या विळख्यात असून, निवडणूक अगदी नजीक असतानादेखील प्रभागातील परिस्थितीत काहीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. दैनंदिन सुविधांचा अभाव, विकासकामांचा गतिरोध आणि नागरिकांच्या प्रतीक्षेत राहिलेल्या निवेदनांमुळे प्रभाग 23 मधील असंतोष वाढताना दिसत आहे. मतदाता एकच मागणी करत आहे की, प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींनी खर्‍या अर्थाने विकासकामांना गती द्यावी, जेणेकरून आम्हाला महापालिकेची पायरी चढावी लागू नये. यंदाच्या निवडणुकीत विकासाचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांचा अभाव हा मुद्दा प्रभाग 23 मध्ये निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

प्रभागातील विकासकामे

• शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगर, शिवाजीवाडी घरकुल योजना, बजरंगवाडी, सिद्धार्थनगर झोपडपट्टी याठिकाणी पाण्याची पाइपलाइन, काँक्रीटीकरण व ड्रेनेज करण्यात आले. • इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरण. • सिटी गार्डन सुशोभीकरण, सुचितानगर येथे जलकुंभ. • के. के. वाघ स्कूलजवळ क्रीडासंकुल. • सुचितानगर येथे महिलांकरिता उद्योग भवन. • दीपालीनगर येथे महिलांकरिता अभ्यासिका. • संत सावता माळी मार्ग रुंदीकरण. • स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यसिका.
• ए. पी.जे. अब्दुल कलाम महिला अभ्यासिका.
• साईनाथनगर, वडाळा रोड येथे भुयारी गटार आणि डांबरी रस्ता. • अशोका मार्ग सिग्नल.

विद्यमान नगरसेवक

सतीश कुलकर्णी 

चंद्रकांत खोडे 

रुपाली निकुळे

  शाहीन मिर्झा   

 

राजकीय परिस्थिती

राजकीय वातावरणातील विद्यमान घडामोडी लक्षात घेतल्यास प्रभागातील निवडणूक चित्र अत्यंत उत्सुकता निर्माण करणारे दिसते. मागील निवडणुकीत भाजपाचे सतीश कुलकर्णी यांनी सातत्याने विजयाची पताका उंचावून आपली भक्कम पकड सिद्ध केली होती. चंद्रकांत खोडे 1997 पासून सातत्याने निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांच्या विजयी मालिकेत फक्त एकदाच महिला आरक्षणामुळे खंड पडला. तरीही त्यांचा जनतेवरील प्रभाव आणि विश्वास कमी न होता पुढील निवडणुकीत त्यांनी पुन्हा दमदार पुनरागमन केले. भाजपाच्या प्रभागातील पहिली मुस्लिम महिला शाहीन मिर्झा होत्या, तसेच रूपाली निकुळे या दोघीही प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे या चारही उमेदवारांनी त्यावेळी भाजपाला शत-प्रतिशत यश मिळवून दिले होते. यावेळच्या निवडणुकीत मात्र नवीन समीकरणे उभी राहण्याची दाट शक्यता आहे. माजी महापौरांच्या कन्या संध्या कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, माजी नगरसेविका नीलिमा आमले यांचे सुपुत्र जयेश आमले व सून अश्विनी आमले, तसेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांचे पुतणे संकेत खोडे, हेही प्रथमच आपले राजकीय नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवे वंशपरंपरागत घटक निर्माण होत असून, मतदारांमध्ये यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतनगर, हॅपी होम कॉलनी, खोडेनगर, जे. एम. सिटी, साईनाथनगर आणि अशोका मार्गाचा काही भाग हा प्रामुख्याने मुस्लिमबहुल परिसर आहे. त्यामुळे या भागातील मतदारसंघात बहुपक्षीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिसरातील सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित मतदानाचा कल कोणत्या दिशेने जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील मनपा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भाजपाला सर्व जागांवर यश मिळेल का, हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. काही राजकीय विश्लेषकांनी भाजपाच्या बाजूने जात असलेले संभाव्य गणित मांडण्यास सुरुवात केली असली, तरी त्या अंदाजाची विश्वासार्हता प्रत्यक्ष मतदानातील नागरिकांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. मतदार पुन्हा एकदा भाजपावर विश्वास टाकून त्यांना नव्याने संधी देतील की, नवीन पर्यायांना पसंती देऊन वेगळे चित्र उभे करतील, हे येणारा काळच स्पष्ट करेल. एकंदरीत आगामी निवडणूक ही अतिशय काट्याची, रोमहर्षक आणि सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्टपणे दिसत आहे.

प्रभागाचा परिसर

भारतनगर, श्रीरामनगर, विनयनगर, हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडेनगर, गणेश बाबानगर, सावता माळी रोड, डीजीपीनगर, कमोदनगर, इंदिरानगर.

प्रभागातील समस्या

• भटक्या कुत्र्यांचा उपद्रव.
• अवजड वाहनांची वाहतूक
• दुर्गंधी सुटलेला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचा नाला.
• कमी दाबाने पाणीपुरवठा.
• प्रभागात विविध ठिकाणी पावसाळी पाणी तुंबणे.
• प्रभागात जागोजागी रस्त्याला खड्डे पडले आहे.
• अंधारमय सायकल ट्रॅक.
• सायकल ट्रॅकवर नशेबाजांचा अड्डा.
• मुख्य रस्त्यांवर बेकायदा पार्किंग.
• इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकची दयनीय अवस्था.
• सिटी गार्डनमध्ये तुटकीफुटकी खेळणी.
• हनुमान मंदिराजवळ असलेले धोकेदायक व असुरक्षित मोडकी खेळणी.
• प्रभागात अंधाराचे साम्राज्य.

इच्छुक उमेदवार

संध्या कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा, रूपाली निकुळे, संकेत खोडे, प्रवीण जाधव, माजिद पठाण, स्वागता उपासनी, इमरान चौधरी, रितिमा गोवर्धने, धीरज भोसले, जयेश आमले, अश्विनी आमले, अ‍ॅड. अन्सार सय्यद, अजिंक्य साने, सोनाली कुलकर्णी, उदय जोशी, सुनील देसाई, विजय माळी, दाऊद शेख, नईमोद्दीन सय्यद, सलमान काझी, जहीर शेख, गणेश खोडे.

इच्छुक म्हणतात…

साईनाथनगर चौफुली ते विनयनगरपर्यंतचा रस्ता रुंदीकरण नाशिक महानगरपालिका जाणूनबुजून करत नाही. तसेच साईनाथनगर चौफुली ते हॉटेल सयाजीपर्यंत रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सिंहस्थ निधीतून रस्ता रुंदीकरण आवश्यक आहे. परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
– संजय बधान, रहिवासी

 

प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, लहान मुलांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नुकताच भटक्या कुत्र्यांनी चिमुकला व महिलांवर हल्ला केला होता. प्रभागात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अंधार दाटलेला असतो.अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे
– हनिफखान पठाण

 

विनयनगर ते दीपालीनगर तसेच साईनाथनगर सिग्नल या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना चालणेसुद्धा मुश्कील झाले आहे. गॅस वाहिनीसाठी खोदलेला रस्ता आजही दुरुस्त करण्यात आलेला नाही. आम्हा ज्येष्ठ नागरिकांना या समस्यांचा फार त्रास होत आहे
– प्रभाकर उगले, ज्येष्ठ नागरिक

 

साईनाथनगर येथील मंदिर परिसरात मुलांची खेळणी तुटकीफुटकी झाल्याने तिथे अस्वच्छता पसरली आहे. तुटलेल्या खेळण्यांवर लहान मुलांचा सतत वावर असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होत आहे. पालकांमध्येही चिंता वाढली आहे. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक ठरत आहे.
– इब्राहिम अत्तार, ज्येष्ठ नागरिक

 

खोडेनगर येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचल्याने पाणी रस्त्यावर ओसंडत वाहत आहे. परिसरातील रस्तेही अतिशय खराब असल्याने दररोज अपघातांची शक्यता वाढली आहे. येथील जुनी व लहान ड्रेनेज लाइन वारंवार चोकअप होत आहे. परिसरात सांडपाण्याचा त्रास कायम आहे. याठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर कोणतीही सुविधा नसल्याने तेथे उद्यान उभारावे.
– अजिज पठाण, निवृत्त पोलीस अधिकारी

 

2011 नुसार लोकसंख्या

• लोकसंख्या ः 51,191
• अनुसूचित जाती ः 4,997
• अनुसूचित जमाती ः 4,800

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *