सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा बनला फिल्म इंडस्ट्रीचा ‘ही-मॅन’
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होते. पण सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
सन 1981 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते
धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी ’विजयता फिल्म्स’ हे त्यांचं प्रॉडक्शन हाउस सुरू केलं. विजयता फिल्म्सच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वांत आधी त्यांची दोन्ही मुले सनी देओल व बॉबी देओल यांना बॉलीवूडमध्ये आणले. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांत संधी दिली. त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ’शोले’, ’चुपके चुपके’, ’सत्यकाम’, ’सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं, तरीसुद्धा ते कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.

राजकारणातही एन्ट्री
धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि पुत्र सनी देओल हे राजकारणात आहेतच; परंतु धर्मेंद्र यांनी स्वत:ही निवडणूक लढवली होती. 2004 ला राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत साठ हजार मतांनी विजय प्राप्त केला होता. काँग्रेसच्या रामेश्वर लाल दुडी यांचा त्यांनी पराभव केला होता. पण त्यांची ही राजकीय कारकीर्द पाच वर्षांचीच राहिली. कारण ते स्वत: सांगत त्यांना राजकारणापेक्षा चित्रपटाची जास्त आवड आहे.

51 रुपयांपासून चित्रपटसृष्टीचा प्रवास
ती तारीख होती 4 नोव्हेंबर 1960 जेव्हा चित्रपटगृहात एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे नाव होते ‘दिल भी तेरा हम भी तेरे’. अर्जुन हिंगोरानी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये एका नवीन अभिनेत्याचा प्रवेश घडवला.
दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला, तेव्हा धर्मेंद्रने किमान पाच हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. पण त्याला फक्त 51 रुपये मिळाले. तिघांनी प्रत्येकी 17 रुपये योगदान दिले. हे मानधन कमी असतानाही धर्मेंद्रने त्या 51 रुपयांना खूप भाग्यवान मानले. या चित्रपटामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला हा अभिनेता मिळाला.
अभिनेत्याने खलनायक म्हणून जिंकले मन
आपण सर्वांनी धर्मेंद्रला अॅक्शन भूमिकांमध्ये पाहिले आहे; परंतु असा एक चित्रपट आहे ज्यामध्ये या अभिनेत्याने खलनायक म्हणून चाहत्यांचे मन जिंकले. तो चित्रपट म्हणजे 1964 मध्ये प्रदर्शित झालेला आयी मिलन की बेला. या चित्रपटात राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते आणि धर्मेंद्रने नकारात्मक भूमिका साकारली होती. पण धर्मेंद्रच्या अभिनयाचा लोकांवर इतका जादुई प्रभाव पडला की, तो घराघरांत लोकप्रिय झाला. धर्मेंद्र जेव्हा त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात करत होता तेव्हा त्याचे नाव अभिनेत्री मीना कुमारीशी जोडले गेले. अशाही अफवा होत्या की, मीना कुमारी यांनी धर्मेंद्रला बॉलिवूडमध्ये एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित करण्यास मदत केली. पण धर्मेंद्र आधीच विवाहित होते.

‘शोले ‘ पासून सुरू झाली प्रेमकहाणी
सन 1975 मध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. जया बच्चन अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्या, तर हेमा मालिनी
धर्मेंद्र यांच्यासोबत दिसल्या. असे म्हटले जाते की, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. असेही म्हटले जाते की, जेव्हा हेमा मालिनीसोबतचे त्यांचे सीन शूट होत होते, तेव्हा ते सेटवरील लायटिंग स्टाफला लाच देत असत जेणेकरून त्यांना तिच्यासोबत आणखी काही वेळ शूट करता येईल.
अलविदा धर्मेंद्रजी.. चित्ररेखाटनाद्वारे श्रद्धांजली

सिडको : विशेष प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते व सिनेस्टार धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण कलाक्षेत्र आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या अदम्य संघर्षाला, धैर्याला आणि चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाला सलाम करण्यासाठी अनेक कलावंत, कलाकार आणि चाहत्यांनी सोशल माध्यमांवर श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
कलाशिक्षक संजय जगताप यांनी आपल्या चित्ररेखाटनातून धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या रेखाटनात धर्मेंद्र यांच्या चित्रपट जीवनातील संघर्ष, धैर्य आणि कलाक्षेत्रात केलेले बलिदान व्यक्त केले आहे. जगताप यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जेष्ठ अभिनेते यांना मानाचा मुजरा अर्पण केला असून, विनम्र अभिवादन व्यक्त केले आहे.
धर्मेंद्र यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम करत अनेक शालेय व प्रौढ वर्गासाठी आदर्श निर्माण केला. त्यांच्या अभिनय शैलीने आणि व्यावसायिक धैर्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक युग संपल्याचे जाणवते.
सर्वसामान्य प्रेक्षकांसह कलाकारही धर्मेंद्र यांच्या योगदानाचे कौतुक करत आहेत. संजय जगताप यांच्या चित्ररेखाटनाने त्यांच्या चाहत्यांना आणि कलावंतांना धर्मेंद्र यांच्या स्मृतीशी जोडले आहे.
लग्नासाठी थेट इस्लाम कबूल केला!

धर्मेंद्र पडद्यावर जितके सुपरहिट ठरले तितकेच वैयक्तिक आयुष्यातही
चर्चेत राहिले. त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनीसोबत विवाह करण्यासाठी त्यांनी थेट इस्लाम कबूल केला होता आणि हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला होता.
धर्मेंद्र विवाहित असल्याने हेमा मालिनीचे कुटुंब त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. धर्मेंद्रपासून हेमाला दूर करण्यासाठी कुटुंबाने हेमाचे लग्न जितेंद्रशी ठरवूनसुद्धा टाकले होते. ते लग्नाच्या तयारीत होते तेव्हाच धर्मेंद्र हे जितेंद्र यांची प्रेयसी शोभासोबत हेमाच्या घरी आला आणि त्यांनी लग्न थांबवले. धर्मेंद्र हेमाशी लग्न करण्यासाठी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट देऊ इच्छित होते. मात्र, त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट देण्यास नकार दिला. यानंतर धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनीला दुसर्या पत्नीचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांचे लग्न चांगलेच वादात अडकले. मात्र, असे काही झाले नव्हते. याचा खुलासा धर्मेंद्र यांनीच एका कार्यक्रमादरम्यान टिव्हीवर केला होता. हेमापासून धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत, ईशा आणि अहाना. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी जोडप्यांपैकी एक मानले जाते.
गाजलेले काही चित्रपट
भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अविस्मरणीय कारकिर्दीतील गाजलेले काही चित्रपट.
शोले
रमेश शिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1975 साली आलेला शोले हा चित्रपट धर्मेंद्र यांना वेगळी ओळख देऊन गेला. त्यांनी या चित्रपटात केलेली भूमिका चांगलीच अजरामर झाली. याच चित्रपटापासून त्यांना ’वीरू’ असे आदराने म्हटले जाऊ लागले.
प्रतिज्ञा
सन 1975 मध्येच प्रदर्शित झालेला ’प्रतिज्ञा’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या करिअरमधील एक अतिशय महत्त्वाचा अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट आहे. यात त्यांनी एका गावकर्याची भूमिका साकारली आहे. ’मैं जट यमला पगला दीवाना’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे याच चित्रपटातील आहे, जे आजही लोकांच्या ओठांवर आहे.
चुपके चुपके
ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1975 साली आलेला चुपके चुपके हा चित्रपटही धर्मेंद्र यांच्या अभिनयामुळे चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी परिमल त्रिपाठी हे पात्र साकारले होते.
द बर्निंग ट्रेन
धर्मेंद्र यांचा द बर्निंग ट्रेन हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना, हेमा मालिनी, जितेंद्र, परवीन बॉबी, नीतू सिंग यांच्यांसोबत स्क्रीन शेअर केला होता.
धरम वीर
हा चित्रपट 1977 साली आला होता. या चित्रपटात त्यांनी वीर हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी प्राण, जितेंद्र, रंजित यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केला होता.
रॉकी और रानी की प्रेमकहानी
अलीकडेच रणवीरसिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और रानी की प्रेमकहानी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात शबाना आझमी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री जुळून आली होती.
हकिकत
भारत-चीन युद्धातील एका भारतीय सैनिकाची कथा हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या चित्रपटात धर्मेंद्र प्रथमच सैनिकाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला होता.
फूल और पत्थर
हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र अॅक्शन हीरो म्हणून समोर आले होते. या चित्रपटात मीना कुमारी त्यांच्यासोबत होती.
सत्यकाम
हा चित्रपट 1969 साली प्रदर्शित झाला होता. शर्मिला टागोर, संजीव कुमार यांसारख्या कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.
मेरा गाव मेरा देश
यात धर्मेंद्र यांच्यासोबत विनोद खन्ना, आशा पारेख यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गीते आजही तेवढ्याच आवडीने ऐकली जातात.
चरस
अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने ओपप्रोत असलेला चरस हा चित्रपट 1976 साली आला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे.