उंबरठा ओलांडलेल्या 117 मुली चाइल्ड लाइनमुळे सुखरुप
178 मुलांनीही घरातून केले होते पलायन
नाशिक ः देवयानी सोनार
घरातून पलायन केलेल्या तब्बल 295 मुले-मुलींना चाइल्डलाइनच्या मदतीमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात यश आले आहे. गेल्या वर्षभरात 178 मुलांनी घरातून पलायत केले तर 117 मुलींनी घराचा उंबरठा ओलांडला होता. एप्रिल आणि जून महिन्यात सर्वाधिक मुला-मुलींनी घरातून पलायन केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
प्रेमप्रकरण, मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून, आई-वडील रागावले, अभ्यासाचा वाढता तणाव, गरिबीची परिस्थिती, चुकीची संगत, स्वप्नाळू दुनियात वावरणे, मोठ्या शहरात जाऊन व्यवसाय करू किंवा फिल्मी दुनियेत करिअर, पालकांच्या अपेक्षा लादणे, घरातील तणाव या व अशा अनेक कारणांमुळे मुले-मुली घर सोडून जातात. घर सोडून पलायन करणार्या मुलांमध्ये सहा वर्षे आणि त्या अधिक किशोरवयीन, तरुण मुलामुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरातून पळून आलेल्या अनेक लहान मुलांना आपली नावे आणि घराचा पत्तासुद्धा सांगता येत नाही.
अनेक मुले ग्रुपने देखील पलायन करतात. घर सोडलेली ही मुले कधी भिकार्यांच्या टोळीच्या हाती लागतात, तर कधी व्यसनाधीन होतात. कधी बालकामगार म्हणून तर कधी लैंगिक शोषण होते. अशी मुले घाबरलेल्या अवस्थेत आढळून येतात. नक्की कुठे जायचे माहिती नसते किंवा माहिती असले तरी ओळख लपविण्यासाठी प्रयत्न करणे. अशा अनेक गोष्टीमुळे पलायन करणारी मुले पोलीस, नागरिक तसेच रेल्वे पोलिसांना लक्षात येतात. संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्यात येते.स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या मुलांची नोंद होते. त्यानंतर त्यांना सुधारगृहात ठेवण्यात येते.
पलायन करणार्या मुलामुलींचे वर्षभरातील प्रमाण पाहता मुलांशी कमी होत चाललेला संवाद, सुखवस्तू जीवन जगणे, विनासायास हव्या त्या गोष्टी मिळाव्यात अशी मानसिकता होत आहे. पालकांनी पाल्याचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. पाल्यांसोबत मैत्री करून, त्यांची बाजू घेतली पाहिजे. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजे. ठराविक वयोगटातील बालकांना करिअर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, बालकांना योग्य ते मार्गदर्शन देणे.ठराविक वयोगटातील बालकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. बालकांना समजून घेत नसेल तर बाहेरील व्यक्तीची मदत घेणे. वयानुसार भावना व मानसिकता समजून घेतल्या पाहिजे. समाजात असलेल्या चांगल्या व वाईट गोष्टीची जाणीव करून देणे. पालकांनी आपले विचार बालकांवर लादू नये. आपल्या बालकांची तुलना इतर बालकांसोबत करू नये. किशोरवयीन वयोगटात बालकांमध्ये होणारे शारीरिक बदल व त्यापासून होणारे दुष्परिणाम हे बालकांना सांगणे, असे या समुपदेशक आणि मानसिकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
24 तास सेवा
चाइल्डलाइन 1098 ही महिला आणि बालविकास मंत्रालयाची सेवा आहे. चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन ही भारतातील एक गैरसरकारी संस्था (एनजीओ) आहे. जी संकटात असलेल्या मुलांसाठी चाइल्डलाइन नावाची टेलिफोन हेल्पलाइन चालवते. ही भारतातील पहिली 24-तास, टोल फ्री, मुलांसाठी फोन आउटरीच सेवा होती. चाइल्डलाइन सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. हे 602+ जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे, 144+ रेल्वे स्थानके आणि 11 बस टर्मिनल्समध्ये चाइल्ड हेल्प डेस्क आहेत.
ही आहेत पळून जाण्याची कारणे
प्रेमप्रकरण, पालकांसोबत वादविवाद, सावत्र आई-वडील, . विभक्त पालक किंवा घटस्फोटित पालक, मोठ्या शहराचे आकर्षण, अभ्यासाची आवड नाही. नैराश्य, मोबाइलचे आकर्षण, करिअर निवडताना बालकांच्या मनाविरुद्ध करिअर निवड करणे, सारखे टोचून बोलणे.
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने नवी मुंबईत चाइल्डलाइन-1098 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. पळून आलेली मुले पोलीस, नागरिक तसेच रेल्वे चाइल्डलाइनच्या सतर्कतेमुळे सापडतात. सहज ओळखू येतात. या मुलांबाबतीत स्टेशन मॅनेजरला कळविण्यात येते.त्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंद होते. पोलीस संबंधित यंत्रणांना कळवितात. या मुलांची वैद्यकीय तपासणी करून महिला व बालकल्याण मदतीने शेल्टर होममध्ये ठेवण्यात येते. त्यानंतर या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले जाते.
-सुवर्णा वाघ केंद्र समन्वयक रेल्वे चाइल्डलाइन नाशिक
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली मुले वा मुली तसेच गैरव्यवस्थेत आढळल्यास त्या बालकाला बालकल्याण समितीकडे दाखल करून घेण्यात येते. त्या बालकाच्या पालकांचा शोध घेण्यात येतो.
अजय फडोळ
(महिला व बालविकास अधिकारी)
वर्षभरातील आकडेवारी
महिना मुले मुली
जानेवारी 15 19
फेब्रुवारी 13 4
मार्च 12 6
एप्रिल 19 19
मे 18 17
जून 28 8
जुलै 12 9
ऑगस्ट 15 11
सप्टेबर 17 09
ऑक्टोबर 11 03
नोव्हेंबर 13 3
डिसेंबर 5 9