अतिवृष्टीचा बागांना फटका; जिल्ह्यात 15 जणांची नोंदणी
लासलगाव : समीर पठाण
राज्यात यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका डाळिंबबागांना बसला. परिणामी उत्पादन व दर्जेदार फळे कमी प्रमाणात हाती लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीतही शेतकर्यांनी डाळिंबाच्या निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आतापर्यंत 13 हजार 772
शेतकर्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. आणखी संख्यावाढीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातून गेल्या वर्षी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी सुमारे 22 हजार शेतकर्यांनी (मार्चपर्यंत) नोंदणी केली होती. गेल्या वर्षभरात सुमारे 19,676 टन डाळिंब निर्यात झाली होती. वास्तविक, गेल्या तीन ते चार वर्षांपासून डाळिंबावर नैसर्गिक संकटांची मालिका सुरू असतानाही शेतकरी निर्यातीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. युरोपियन देशासह आखाती, बांगलादेशात निर्यात मोठ्या प्रमाणात होते.
राज्यातून यंदाच्या हंगामात डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू आहे. 11 हजार 27 शेतकर्यांनी निर्यातीसाठीच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. दोन हजार 724 शेतकर्यांनी नवीन परवाने घेतले आहेत. यंदा मेपासून सुरू असलेल्या पावसाने डाळिंबाच्या हंगामाचे नियोजन विस्कळीत केले. त्यातूनही शेतकर्यांनी बागांचा बहर धरला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला.
सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्राची
महाराष्ट्रापेक्षा या राज्यांतून निर्यात करणार्या शेतकर्यांची संख्या कमीच असते. यंदाच्या हंगामातही अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांतून एकूण 13 हजार 824 शेतकर्यांनी आतापर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. अर्थात, महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी झाली असल्याचे ’अपेडा’च्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. राज्यातील डाळिंबाला जगातील बाजारपेठेत मोठी मागणी असते.
जिल्हानिहाय झालेली नोंदणी
अहिल्यानगर 699
छ. संभाजीनगर 14
बुलडाणा 03
धुळे 29
जळगाव 14
नाशिक 15
पुणे 2,285
सांगली 1,237
सातारा 02
सोलापूर 9,474
एकूण 13,772
13,772 farmers from the state will export pomegranates