प्रलंबित मागणीची पूर्तता; 1501 पैकी 1464 प्रस्ताव पात्र
नाशिक ः प्रतिनिधी
जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शाळांमधील 24 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या प्राथमिक शिक्षकांना निवड वेतनश्रेणीचा लाभ देण्याची महत्त्वपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, यामध्ये एकूण 1464 शिक्षकांना फायदा होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार व चट्टोपाध्याय आयोगाच्या वेतनशिफारशींच्या धर्तीवर ही निवडश्रेणी लागू करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या सूचनेनुसार व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली. निवडश्रेणी लाभासाठी जिल्हा परिषद नाशिक येथे गटामार्फत एकूण 1501 प्रस्ताव प्राप्त झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत प्रस्तावांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1464 प्रस्ताव पात्र ठरविण्यात
आले आहेत.
सन 2024 मध्ये प्रथम टप्प्यात जिल्हा परिषद नाशिकने 2325 शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ दिला होता. त्यानंतर आता द्वितीय टप्प्यात 1464 शिक्षकांना हा लाभ मंजूर झाल्याने प्रलंबित असलेल्या मागणीची प्रभावी पूर्तता झाली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रशेखर वैष्णव, वरिष्ठ सहाय्यक सलीम पटेल, कनिष्ठ सहाय्यक रोहित शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन पवार व कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
1464 teachers of the district will benefit from the selection category