कुंदन परदेशीसह प्रेयसीकडून महिला डॉक्टरची फसवणूक

म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

पंचवटी : प्रतिनिधी
हत्या आणि खुनी हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला शहरातील कुख्यात गुन्हेगार कुंदन परदेशी आणि त्याची कथित प्रेयसी मानसी वाळके हिचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. या दोघांनी आपल्या घरासमोर राहणार्‍या एका महिला डॉक्टरला भावनिक जाळ्यात ओढून, जेलमधून सुटण्याच्या बहाण्याने तब्बल पाच लाख रुपयांना गंडा घातला.

डॉक्टरने आपले पैसे परत मागितले असता, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला डॉक्टर दिंडोरी तालुक्यात सहाय्यक डॉक्टर म्हणून कार्यरत असून, त्या मखमलाबाद येथील माळी मंगल कार्यालय परिसरात कुंदन परदेशीच्या घरासमोर राहतात.
कुंदनसोबत राहणारी आरोपी मानसी अनामिक वाळके हिने महिला डॉक्टरशी मैत्री केली. कुंदन सध्या जेलमध्ये असून, त्याला बाहेर काढण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याचे मानसीने रडून सांगितले.
तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मदतीसाठी तयार झालेल्या डॉक्टरकडून आरोपींनी सोन्याची चेन, कानातले झुमके आणि अंगठी घेतली. जामीन मिळताच दागिने किंवा पैसे परत करू, असे आश्वासन आरोपींनी दिले होते.
एवढेच नव्हे, तर मदतीच्या बहाण्याने डॉक्टरच्या नावे फोन पेवरून 2,87,580 रुपयांचे कर्ज आणि बजाज फायनान्सकडून 1,63,000 रुपये काढून घेतले. भेळ विक्रेते सुनील परदेशी यांच्या हत्येप्रकरणी कुंदन परदेशीला जन्मपेठेची शिक्षा झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर जेव्हा महिला डॉक्टरने आपले पैसे परत मागितले, तेव्हा परदेशी आणि मानसीने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. कुंदनने मोबाइलवरूनही महिला डॉक्टरला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली, ज्याचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. हा सर्व प्रकार वर्ष 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला आहे. सतत मिळणार्‍या धमक्यांना कंटाळून पीडितेने म्हसरूळ पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या कुंदन परदेशी गंगापूर पोलिसांच्या कोठडीत असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळवंत गावित या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Female doctor cheated by lover along with Kundan Pardeshi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *