परिमंडळ-2 कार्यक्षेत्रातील 16 सराईत गुन्हेगार हद्दपार

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ-2 कार्यक्षेत्रातील 16 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
शहरात सार्वजनिक शांतता राखणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे, तसेच आगामी महापालिका निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या व गुन्हेगारी हालचाली सुरू असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तडीपारी, एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धता, तसेच मकोका कायद्यान्वये कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हेगारी नोंदी असलेल्या व्यक्तींचा सखोल आढावा घेत अधीनस्त सहायक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया आदर्श आचारसंहितेनुसार पार पडावी यासाठी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा आणि त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी हद्दपारीसह विविध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांकडून प्राप्त हद्दपार प्रस्ताव व सहायक पोलीस आयुक्तांकडून झालेल्या चौकशी अहवालांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) नुसार कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक, अशा एकूण 16 गुन्हेगारांना नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. काही गुन्हेगारांच्या प्रस्तावांची चौकशी अद्याप सुरू असून, अंतिम चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सराईत व संघटित गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, स्थानबद्धता तसेच मकोकाअंतर्गत कारवाई व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. गुन्हेगार, त्यांचे समर्थक तसेच बेकायदेशीर मदत करणार्‍यांनी आपल्या वर्तनात सुधारणा करावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी ‘साध्या वेशातील पोलीस’ म्हणून निर्भीडपणे माहिती व तक्रारी पोलिसांना द्याव्यात, माहिती देणार्‍यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आगामी मतदान प्रक्रियेत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता नाशिककर मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे

अंबड पोलीस ठाणे ः नितीन कैलास बचाटे (वय 21, रा. सनी भामरे यांच्या घरात भाडेतत्त्वावर, सुभाषचंद्र बोस गार्डनच्या मागे, सावतानगर, सिडको, नाशिक), गणेश ऊर्फ नड्डी अरुण गायकवाड (वय 20, रा. इंदिरा गांधी वसाहत क्र. 1, लेखानगर झोपडपट्टी, नाशिक), प्रदीप ऊर्फ बोंबल्या प्रकाश गोफणे (वय 29, रा. शिवपुरी चौक, गल्ली नं. 1, उत्तमनगर, सिडको, नाशिक), सिद्धार्थ किशोर दोंदे (वय 26, रा. एन 52 आर/2/12/2, महाराणा प्रताप चौक, मुक्तांगण शाळेजवळ, सिडको, नाशिक), तेजस संजय खर्डे (वय 24, रा. एन 53, एसएफ 1/10/8, शिवपुरी चौक, सिडको, नाशिक), गौरव उमेश पाटील (वय 27, रा. एन 42/जेबी1/8/7, चौथी स्कीम, पवननगर, सिडको, नाशिक), तौसिक असिफ शेख (वय 23, रा. एन 41-सीडी 1/1/6, हेडगेवार चौक, दत्तमंदिर स्टाफ, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक), अभिषेक ऊर्फ सनी हिरामण बच्छाव (वय 26, रा. फ्लॅट नं. 402, डी. व्ही. विंग, श्री एम्पायर बिल्डिंग, फडोळ मळा, अंबड, नाशिक), नीलेश भाऊसाहेब चव्हाण (वय 24, रा. फ्लॅट नं. 40, बिल्डिंग नं. 7, शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक), गौरव प्रवीण जाधव (वय 19, रा. एनएच 20, सी2/8/1, शांती विनायक चौक, पवननगर, सिडको, नाशिक), अजय ऊर्फ अज्जू संजय आठवले (वय 26, रा. एन 1/73, शनी मंदिराजवळ, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), हेमंत वीरेंद्र गोला (वय 23, रा. एन 41-सीडी 1/17/6, हेडगेवार चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक).
इंदिरानगर पोलीस ठाणे ः आरबाज आसिफ शेख (वय 25, रा. फ्लॅट नं. 5, गुलशन बिल्डिंग, हसन मंझिल, खंडेरावनगर, पाथर्डी फाटा, नाशिक), साहिल अत्तार शेख (वय 24, रा. गुलशन बिल्डिंग, हसन मंझिल, खंडेरावनगर, पाथर्डी फाटा, नाशिक), आकाश विश्वनाथ वानखेडे (वय 31, रा. अहिल्यानगर, सुखदेवनगर, पाथर्डी गाव, नाशिक).
सातपूर पोलीस ठाणे ः अमोल संजय मांजरे (वय 24, रा. रोहिदास चौक, प्रबुद्धनगर, सातपूर, नाशिक).

16 inmate criminals deported from Zone-2 jurisdiction

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *