दहा जणांना घेतले ताब्यात: खासगी सावकारी चर्चेत
नाशिक : प्रतिनिधी
सातपूरच्या अशोकनगरमध्ये पित्यासह दोन्ही मुलांनी सावकारी जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येनंतर नाशिकमध्ये चालणारी खासगी सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या आत्महत्येला जबाबदार असणार्या 21 सावकार सद्या पोलिसांच्या रडारवर असून, त्यापैकी दहा जहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. तर उर्वरित सावकारांचा शोध घेतला जात आहे.
सातपूरच्या अशोकनगर येथील फळविक्रेते दीपक शिरोडे त्यांची मुले प्रसाद व राकेश यांनी रविवारी दुपारी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत 21 खासगी सावकारांकडून वारंवार होणार्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी खासगी सावकारांचा शोध घेऊन त्यातील दहा जणांना ताब्यात घेतले आहे. काल सकाळी तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी प्रतिभा शिरुडे यांनी फिर्याद दिली. वेळोवेळी घेतलेल्या कर्ज आणि व्याजाच्या वसुलीसाठी खासगी सावकार दुकानावर घरी यायचे. तसेच फोनवरुनही धमकी द्यायचे. त्यामुळे पती आणि दोन्ही मुलांना गळफास घेण्याची वेळ आली. त्यामुळे सातपूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या खासगी सावकारांवर दाखल केला आहे.
हे आहेत सावकार
एम.आर. धामणे, राजाराम काळे, मुकेश लोहार, भास्कर सोनवणे, शांताराम नागरे (रा. पिंंपळगाव बहुला) संजू पाटील (रा. शिवाजीनगर) प्रकाश गोर्हे, नलिनीताई शेलार बाविस्कर साहेब. कैलास गोराणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत वंजी पाटील,किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे, शरद पिंगळे
एका पोलिसाचाही सहभाग
खासगी सावकारकीमध्ये एका ग्रामीण पोलीस कर्मचार्याचाही सहभाग असल्याची चर्चा असून, सदरचा पोलीस कर्मचारी सद्या निलंबित आहे. त्यामुळे ज्यांनी खासगी सावकारांवर कारवाई करायची त्याच खात्यातील कर्मचारीच जर खासगी सावकारी करीत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात खासगी सावकारकी जोरात
शहरात अनेक सामान्य कुटुंबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांना व्याजावर पैसे देणारे अनेक खासगी सावकार असल्याची चर्चा आहे. मागील महिन्यात पाथर्डी फाट्यावरील एका दाम्पत्याने खासगी सावकारकीलाच कंटाळून आत्महत्या केली होती.
पोलिसांच्या तपासाबाबत संशय
सातपूर पोलिसांचे गेल्या काही महिन्यांपासूनचा कारभार पाहिल्यास सातपूर भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहेत. वाहनांच्या काचा फोडणे, टवाळखोराचा वावर असे प्रकार सातत्याने घडत आहेत. विशेष म्हणजे सकाळी एकाची धिंड काढल्यानंतर दुपारी संशयिताला जामीनही मंजूर झाला होता. सहा ते सात महिन्यापूर्वीही एका भाजी विक्रेत्याने खासगी सावकारकीलाच कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सातपूर भागात घडली होती. मात्र, सातपूर पोलिसांनी या प्रकरणातही नंतर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता तरी या तीन जणांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.