ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे 22 रुग्ण

102 नागरिकांना महापालिकेच्या नोटिसा

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या वर्षी उच्छाद घालणार्‍या डेंग्यूची रुग्णसंख्या यंदा बर्‍यापैकी घटली असली, तरी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूची रुग्णसंख्या थेट 22 वर गेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान रुग्णसंख्या 476 आहे. दरम्यान, डेंग्यूप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने 102 नागरिकांना नोटिसा पाठवल्या आहेत.
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी फ्रीज, कूलरमध्ये पाणी साचवू देऊ नये. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे एक हजार रुग्ण होते. मात्र, यंदा मेपासून शहरात पावसाने हजेरी लावल्याने डेंग्यूचा आलेख कमी आल्याचे दिसते. महापालिकेच्या मलेरिया विभागाने यंदा लवकरच डेंग्यू नियंत्रणाबाबत उपयोजना सुरू केल्या होत्या. डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मनपाच्या मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून शहरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत होता. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. जेथे जेथे डास उत्पत्ती केंद्र आढळून येत आहे ते नष्ट केले जात आहे. पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत आहे. त्या पाण्यात डेंग्यूचा संसर्ग करणार्‍या डासांची उत्पत्ती होते. म्हणून अशा ठिकाणी औषध फवारणीदेखील करण्यात येत आहे. रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर, अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू डासाची उत्पत्ती होते. अशा ठिकाणी मनपाचे पथक पाहणी करून नोटिसा देत असल्याची माहिती मनपाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश कोशिरे यांनी दिली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *