सहा महिन्यांत 295 अपघात; शंभराहून अधिक बळी

खड्डे, वेगमर्यादा उल्लंघन व निष्काळजीपणामुळे अपघातांत वाढ

नाशिक : देवयानी सोनार
नाशिक शहर व जिल्ह्यातील रस्ते अपघातांची वाढती संख्या आता गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांत 295 अपघातांची नोंद झाली असून, त्यात 102 जणांचा मृत्यू झाला आहे. 217 जण गंभीर जखमी, तर 59 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरून रस्त्यावरून चालणारे पादचारी, वाहनचालक आणि प्रवासी, कोणीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते.
दररोज शहरात एकापेक्षा अधिक अपघात घडत आहेत. प्रवास करणे धोकादायक बनले आहे. शहरातील खराब रस्ते, वाढलेला वाहनांचा वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत.

नाशिक शहर आणि खड्डे यांचे जणू समीकरणच झाले असून, शहर व उपनगरांना जोडणार्‍या रस्त्यांवर अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत.
काही घटनांत गुगल मॅपवरील चुकीच्या दिशानिर्देशामुळे वाहन थेट खड्ड्यात, पुलावरून किंवा विहिरीत कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
तरुणांत अपघातांचे प्रमाण अधिक
अपघातांत विशेषतः तरुणांचे प्रमाण अधिक असून, स्टंटबाजी, ट्रिपलसीट, वेगाची स्पर्धा आणि सोशल मीडियासाठी रील्स बनवताना निष्काळजीपणा यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

कारवाईपेक्षा जनजागृतीची गरज
वाहतूक विभागाने हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती, ई-चलन आणि सीसीटीव्ही यंत्रणा यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या मोहिमा अल्पकाळच प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते.

नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची
प्रशासनाच्या उपाययोजनांबरोबरच नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त रुजविण्यासाठी जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. अपघातांनंतर कायदेशीर प्रक्रिया आणि विमा दाव्यांची पूर्तता सुलभ व्हावी यासाठी आयआरएडी (इंटिग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डाटाबेस) आणि ईडीएआर (इलेक्ट्रॉनिक डीटेल्ड अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट) प्रणालीअंतर्गत माहिती अचूकपणे नोंदवण्यावर भर दिला जात आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि वेगमर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःहून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे
– अद्विता शिंदे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)

वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. वाहनांची वाढीव संख्या लक्षात घेता मूलभूत विकासकामे सरकारकडून केली गेली पाहिजेत. ट्रकचालकांना आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे स्वास्थ्य चांगले राहील. त्यामुळे रस्ते अपघात कमी होतील.
– सचिन जाधव, मोटार मालक- कामगार वाहतूक सेल, प्रदेशाध्यक्ष

अवजड वाहतूक बनलीय अवघड
शहरातील गजबजलेल्या गोविंदनगर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड या भागांत बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी अवजड वाहने कोणत्याही नियमांचे पालन न करता भरधाव धावताना दिसतात. अनेकदा वाहनांना नंबरप्लेट नसणे, ओव्हरलोडिंग सामान असणे, सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सध्या सिंहस्थ कामांमुळे शहरातील रस्त्यांवर अनेक रस्ते बांधकाम यंत्रे, मिक्सर, साहित्याच्या वाहनांमुळे रस्त्यांवर बांधकामाचे मिश्रण सांडण्याचे प्रमाण वाढले आहे. या कामांमुळे रस्त्यावरील खड्डे व उंचवटे तयार होत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.

पोलिसांना कळविल्यास कारवाई
वाहतूक पोलीस विभागाने नियमबाह्य वाहतुकीबाबत काही आक्षेपार्ह आढळल्यास वाहतूक पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याबाबत संबंधितांना तातडीने सूचना केल्या जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी सांगितले आहे.

अपघातांची प्रमुख कारणे

वेगमर्यादा ओलांडणे.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे.
मोबाईलचा वापर करत ड्रायव्हिंग.
हेल्मेट व सीटबेल्टचा वापर टाळणे.
खड्डेमय व खराब रस्ते.
अपुरी प्रकाशयोजना व अकार्यक्षम सिग्नल.
दिशादर्शक फलकांचा अभाव.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी

वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी.
स्पीडगन व सीसीटीव्हीचा प्रभावी वापर.
मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई.
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती.
शाळा, महाविद्यालयांत जनजागृती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *