58 किमी एमआरटीएस, 131 किमी पादचारी मार्गांचा प्रस्ताव
महामेट्रोकडून लोकप्रतिनिधी व विविध विभागांसमोर सीएमपी मसुद्याचे सादरीकरण; सात दिवसांत सूचना मागवल्या
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा, वेगाने होत असलेल्या नागरीकरणाचा आणि भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याच्या मसुद्याचे सादरीकरण मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांसमोर करण्यात आले.
या आराखड्यावर सर्व संबंधित विभागांनी व भागधारकांनी सात दिवसांत लेखी सूचना व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले असून, अंतिम आराखडा सप्टेंबर 2026 पर्यंत राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांच्याकडे शहराचा अद्ययावत गतिशीलता आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली होती. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सन 2056 पर्यंतच्या नियोजनाचा विचार करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यात शहराची विद्यमान वाहतूक व्यवस्था, लोकसंख्यावाढ, भू-वापरातील बदल, सार्वजनिक वाहतूक, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि भविष्यातील गरजांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
बैठकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महापौर डॉ. हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार फरांदे व राहुल ढिकले यांनी गंगापूर रोड ते नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गावर जोडणार्या रस्त्यांवरील वाहतुकीचाही नियोजनात समावेश करण्याची सूचना केली.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विविध विभागांची विकासकामे समन्वयाने व्हावीत यासाठी राज्यस्तरावर सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याची सूचना महामेट्रोला केली.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, भविष्यातील प्रवासी मागणी लक्षात घेऊन शहरासाठी शाश्वत, सुरक्षित आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचा हा दीर्घकालीन आराखडा आहे. हा आराखडा केवळ मेट्रोपुरता मर्यादित नसून, बससेवा, रस्ते, पादचारी, सायकलस्वार, पार्किंग, ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनाचाही त्यात
समावेश आहे.
पादचारी आणि सायकलस्वारांना प्राधान्य
आराखड्यात पर्यावरणपूरक वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला आहे.
* 131 किमी पादचारी मार्ग * 88 किमी स्वतंत्र सायकल ट्रॅक
* गोदावरी नदीकाठावर पादचारी व सायकल मार्ग * सुरक्षित चौक * रस्ता सुरक्षा उपाययोजना * ट्रक टर्मिनल्स व मालवाहतूक व्यवस्थापन * सार्वजनिक वाहतुकीला पूरक रस्त्यांचे नियोजन
रिंगरोड, बससेवा आणि मल्टिमोडल हब
सीएमपीमध्ये पुढील उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.
* शहर बससेवेचे बळकटीकरण * फीडर व सर्क्युलर बससेवा
* आधुनिक बसथांबे * रिंगरोड व मिसिंग लिंक पूर्ण करणे
* प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा * महत्त्वाच्या ठिकाणी मल्टी मॉडेल इन्ट्रीग्रेशन हब विकसित करणे * पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य
58 किमीच्या एमआरटीएस जाळ्याचा प्रस्ताव
मसुदा आराखड्यात शहरासाठी सुमारे 58 किलोमीटर लांबीच्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमची संकल्पना मांडण्यात आली आहे.
गंगापूर – नाशिकरोड रेल्वे स्थानक : 21.50 किमी
गंगापूर – मुंबई नाका – पाथर्डी फाटा : 13.58 किमी
ओझर विमानतळ – मुंबई नाका/पाथर्डी फाटा – अंबड : सुमारे 23 किमी.
या मार्गांना शहर बस, फीडर सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांशी जोडून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वाहतुकीवर विशेष भर
दर 12 वर्षांनी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करून स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
* सार्वजनिक वाहतूक बळकट करणे * पार्किंग व होल्डिंग क्षेत्रांची उभारणी * पादचारी व्यवस्थापन * धार्मिक स्थळांपर्यंत सुलभ संपर्क * बहुविध वाहतूक साधनांचे एकत्रीकरण * कुंभासाठी उभारल्या जाणार्या सुविधा मेळ्यानंतरही शहराच्या कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणण्यावर भर.
30-year city transport plan