पहिल्याच दिवशी 361 अर्जांची विक्री

मालेगाव मनपा निवडणूक; इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री प्रक्रियेला काल सुरुवात झाली. निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी (दि. 23) एकूण 196 नागरिकांनी 361 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली.
यामुळे निवडणूक वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नागरिकांनी अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 येथे 28 व्यक्तींनी 45 अर्जांची खरेदी केली. निवडणूक निर्णय अधिकारी- 2 येथे सर्वाधिक प्रतिसाद मिळत 84 व्यक्तींनी तब्बल 164 अर्जांची खरेदी केली. निवडणूक निर्णय अधिकारी-3 येथे 15 व्यक्तींनी 22 अर्ज घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी-4 येथे 9 व्यक्तींनी 17 अर्जांची खरेदी केली. निवडणूक निर्णय अधिकारी-5 येथे 16 व्यक्तींनी 20 अर्ज घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी- 6 येथे 20 व्यक्तींनी 36 अर्जांची खरेदी केली. निवडणूक निर्णय अधिकारी-7 येथे 24 व्यक्तींनी 57 अर्जांची खरेदी केली आहे.
अर्जविक्री, अर्ज स्वीकृती, छाननी, माघार, चिन्हवाटप आदी संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय सात कार्यालये निश्चित केली आहेत. नवीन तहसील कार्यालय (प्रभाग 2, 11, 12), आयएमए हॉल (प्रभाग 1, 9, 10), प्रभाग क्रमांक 2 कार्यालय (प्रभाग 3, 6, 7), दिलावर हॉल (प्रभाग 4, 5, 8), महापालिकेची जुनी इमारत (प्रभाग 13, 15, 17), वाडिया दवाखाना इमारत (प्रभाग 14, 16, 19) आणि उर्दू घर (प्रभाग 18, 20, 21) येथे ही कार्यालये कार्यरत राहणार आहेत. आचारसंहितेचा मुख्य कक्ष महापालिकेच्या नवीन मुख्य इमारतीत सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या 21 प्रभागांमधून 84 नगरसेवकांची निवड होणार असून, त्यासाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दर्जा एकसाठी आठ, तर दर्जा दोन व तीनसाठी 14 सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक तीन प्रभागांच्या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी चार अधिकार्‍यांवर निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नितीन सदगीर, येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, वन जमाबंदी अधिकारी दत्तात्रय शेजूळ, सारथी उपव्यवस्थापक संचालक बंडू कापसे, चांदवड प्रांताधिकारी कैलास कडलग, एमआयडीसी अधिकारी दीपक पाटील, म्हाडा मुख्याधिकारी शिवकुमार आवळकंठे आणि बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील सात अधिकार्‍यांना प्रत्येकी तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदतीसाठी देण्यात आले असून, आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून महेश शेलार कामकाज
पाहत आहेत.

अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता

पहिल्याच दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणातील अर्ज खरेदीमुळे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत अर्ज भरण्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, मालेगाव महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अर्ज दाखल करणे, छाननी व माघार या प्रक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. प्रशासनाकडून सुरळीत व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

361 applications sold on the first day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *