कर्जमुक्तीच्या तिसर्‍या यादीत 4,691 शेतकरी

जिल्ह्यातील 44 हजार 387 शेतकरी पात्र

नाशिक : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चार हजार 691 शेतकर्‍यांचा तिसर्‍या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पात्र शेतकर्‍यांची संख्या 44 हजार 387 झाली आहे.
यापैकी 36 हजार 167 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकर्‍यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले
आहे.
या योजनेंंतर्गत पात्र शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 23 हजार 771, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत 42 हजार 235 अशा एकूण 66 हजार 6 खातेदारांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कर्जखात्याची खातरजमा आवश्यक
पात्र शेतकर्‍यांनी आपल्या कर्जखात्याची माहिती तपासून जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई-सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांची कर्ज थकबाकी 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2026 पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील ज्या शेतकर्‍यांची 31 मार्च 2026 रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांचे कर्ज शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहे.

मृत व वयस्कर लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था
मृत, वयस्कर तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणार्‍या पात्र लाभार्थ्यांसाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी विशेष मानक कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण, कर्जाची रक्कम किंवा कर्जखात्याच्या क्रमांकाबाबत तक्रार असल्यास आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक शाखा किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.

तीन टप्प्यांत याद्या प्रसिद्ध
28 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत 35 हजार 890 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी 33 हजार 373 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या यादीतील 3 हजार 806 शेतकर्‍यांपैकी 2 हजार 794 जणांचे प्रमाणीकरण झाले आहे. आता 13 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या तिसर्‍या यादीतील शेतकर्‍यांचे प्रमाणीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.

4,691 farmers in the third list for debt relief

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *