गोदाकाठी 51 फुटी रावणाचे दहन; भक्तांचा जल्लोष

‘सियावर रामचंद्र की जय’च्या जयघोषाने पंचवटी दुमदुमली

पंचवटी : प्रतिनिधी
सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय दर्शविणारा रावणदहन सोहळा विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. 20) रात्री श्रीक्षेत्र रामकुंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ या जयघोषांसह आकर्षक फटाक्यांची आतषबाजी आणि 51 फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, अशा भक्तिमय वातावरणात हजारो नाशिककरांनी या सोहळ्याचा अनुभव घेतला.
श्री चतुःसंप्रदाय आखाडा व श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने गेल्या 59 वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी 1967 मध्ये रामकुंड परिसरात या सोहळ्याची सुरुवात केली. सध्याचे महंत पितांबरदास गुरू कृष्णचरणदासजी महाराज यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. यंदाही रामकुंडाजवळील मैदानात सुमारे 51
फूट उंचीचा रावणाचा पुतळा उभारण्यात आला होता.
रावणाच्या पुतळ्याला अग्निडाग देताच परिसरात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी सुरू झाली. आकाशात रंगांची उधळण आणि उपस्थित भाविकांचा जयघोष यामुळे रामकुंड परिसर भक्तिमय झाला. हा सोहळा पाहण्यासाठी होळकर पूल, रामकुंड, गांधी तलाव आणि एकमुखी दत्त मंदिर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रीराम आणि रावणसेनेच्या युद्धाचे सादरीकरण
रावणदहन सोहळ्याच्या निमित्ताने सायंकाळी पंचवटी परिसरातून श्रीराम, लक्ष्मण, मारुती, वानरसेना तसेच रावण, कुंभकर्ण, मेघनाद आणि राक्षससेनेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक रामकुंडाजवळील मैदानात पोहोचल्यानंतर वानरसेना आणि राक्षससेनेमध्ये प्रतीकात्मक युद्ध रंगले. त्यानंतर मारुती-इंद्रजित तसेच श्रीराम-लक्ष्मण आणि रावणाच्या सेनेतील युद्धाचे सादरीकरण करण्यात आले. अखेरीस श्रीरामांनी राक्षसांचा पराभव केल्यानंतर रावणाच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दहन करण्यात आले.

51-foot effigy of Ravana burnt on the banks of the Godavari; devotees cheer

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *