गांधीनगरमध्ये होणार 65 फुटी रावणाचे दहन

सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी

सात दशकांची परंपरा लाभलेल्या गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर यंदा दसर्‍यानिमित्त 65 फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. यंदा या आयोजनाचे 71 वे वर्ष असून, रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी 30 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. शहरातील सर्वांत उंच रावणाची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचा दावा रामलीला समितीने केला आहे. दसर्‍याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी रामलीला समितीचे पदाधिकारी, कलाकार आणि कार्यकर्ते युद्धपातळीवर तयारी करीत आहेत.

गांधीनगर येथील रामलीला मैदानावर दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी रावण दहनाचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. गेल्या 71 वर्षांपासून ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे. काळानुसार या उत्सवाचे स्वरूप विस्तारले असून, नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांसाठी हा सोहळा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. यंदाही रावणाची भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू असून, दसर्‍याच्या दिवशी दुपारपर्यंत प्रतिकृती तयार करून मैदानात उभी केली जाणार आहे.

रामायणातील प्रसंगांचेही सादरीकरण

रावण दहनाबरोबरच रामलीला मैदानावर रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण केले जाते. रामायणातील पात्रांच्या पारंपरिक वेशभूषेत कलाकार आपली कला सादर करतात. त्यामुळे या कार्यक्रमाला धार्मिक महत्त्वासोबतच सांस्कृतिक परंपरेचेही महत्त्व प्राप्त झाले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिक या सोहळ्याचा आनंद घेतात. दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभत असल्याने यंदाही आयोजकांकडून नियोजनावर भर दिला जात आहे.

समितीच्या कार्यकर्त्यांची मेहनत
रावणाची प्रतिकृती तयार करणे, ती मैदानात उभी करणे, रामलीलेतील प्रसंगांचे सादरीकरण आणि कार्यक्रमाच्या व्यवस्थेची जबाबदारी अशा विविध कामांमध्ये रामलीला समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रामलीला समितीचे महासचिव कपिलदेव शर्मा, प्रदीप भुजबळ, संजय लोळगे, दिलबाग राय त्रिखा, अनिल गायकवाड, संतोष कट्यारे, राजू फुलसुंदर, रोहित परदेशी, ओम जाधव, पप्पू कोहली, साहिल शर्मा, संजय रासकर, मनोज कदम, शुभम परदेशी, रमाकांत वाघमारे, गणेश बुटे, सचिन दलाल, गुड्डू परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

गांधीनगरमध्ये 65 फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समितीचे कलाकार आणि कार्यकर्ते एकत्रितपणे ही प्रतिकृती उभारत आहेत. शहरातील सर्वांत उंच रावण उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. दसर्‍याच्या दिवशी रात्री 8.30 वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
– शुभम परदेशी, अध्यक्ष
कलाकार मंच रामलीला समिती गांधीनगर

65-foot-tall effigy of Ravana to be burnt in Gandhinagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *