अग्निशमनच्या ताफ्यात दाखल होणार 90 मीटरची शिडी

आता 30 मजल्यांपर्यंत आग विझविता येणार

शहरात 30 मजल्यांपर्यंतच्या इमारती -10
30 मजले किंवा त्यापेक्षा अधिक सुरू प्रकल्प : 10
या अगोदर मनपाकडे 32 मीटरची शिडी (12 मजल्यांपर्यंत आग विझविता येते) : 1
12 मजल्यांवरील शहरातील इमारती : 700
12 मजले किंवा त्यापेक्षा सुरू प्रकल्प : 300

या महिन्यात 13 तारखेला हे वाहन दाखल होईल. 32 कोटी 26 लाख रुपये किमतीचे हे वाहन आहे. जीएसटी, अबकारी कर यांसह विविध करांचा यात समावेश आहे.
आगीवर नियंत्रण मिळविणे, तसेच उंच इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे यांसारखी कामे होतील.
– संजय बैरागी, मुख्य अधिकारी, अग्निशमन विभाग

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात अखेर 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी 32 कोटी रुपयांची शिडी (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म) पुढील आठवड्यात दाखल होणार आहे. यामुळे शहरातील 30 मजले किंवा त्यापेक्षा उंचीवरील आग विझविण्यासाठी अग्निशमनकडे यंत्रणा असणार आहे.
मनपाने यापूर्वी खरेदी केलेल्या 32 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणार्‍या अग्निशमन शिडीची 15 वर्षांची मुदत संपुष्टात आल्याने नवीन शिडी खरेदीचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार, अडीच वर्षांपूर्वी या नवीन शिडीच्या खरेदीला मंजुरी मिळाली होती. आता सिंहस्थापूर्वी ही शिडी मनपाकडे उपलब्ध होणार आहे. शहरात 30 मजल्यांपर्यंतच्या सुमारे 10 इमारती असून, 10 ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू आहे. यापूर्वी अग्निशमन विभागाकडे 32 मीटरची एकच शिडी होती. ही शिडी साधारण 12 मजल्यांपर्यंतची आग विझवू शकते. 12 मजल्यांपर्यंत शहरात सुमारे 700 इमारती असून, 12 मजले किंवा त्यापेक्षा अधिक सुमारे 300 प्रकल्पांचे काम विविध ठिकाणी सुरू आहे. ही शिडी रिमोटद्वारे आगीवर नियंत्रण करणार आहे. फिनलॅण्ड येथे तयार करण्यात आलेली ही शिडी 90 मीटर उंच अर्थात 30 मजल्यांपर्यंतच्या इमारतींमधील आपत्तीजनक स्थितीत उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे अत्यंत चिंचोळ्या व अरूंद रस्त्यालगत अथवा एखाद्या बिकटप्रसंगी एखाद्या गगनचुंबी इमारतीला आग लागल्यास 20 मीटर अंतरावर हे वाहन उभे करूनही आपत्तीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाने, ज्ञानाने युक्त असलेल्या या शिडीचा बूम रिमोटद्वारे संबंधित आपत्तीजनक इमारतीतील भागापर्यंत पाठवता येऊ शकणार आहे.

90-meter ladder to be added to firefighting fleet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *