*
डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
उन्हाळा सुरु झाला की आंबे, द्राक्ष, टरबूज, संत्री अशा फळांची आठवण येते. उन्हाळा म्हंटलं की शाळेला सुट्टया, सुट्टयांमध्ये फिरायला जाणे, ट्रेकिंग करणे, वॉटरपार्क ला जाणे, स्विमिंग कलासेस लावणे, इतर स्पोर्ट्स शिकणे, किव्हा इतर काहीतरी क्लासेस लावणे… अशा गोष्टी करण्याची वेळ असते. बरेच लोक या सुट्टयांमध्ये पर्यटनाची संधी म्हणून देशातील किव्हा परदेशातील पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळांना फिरायला जातात.
उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे, हे नित्याचेच झाले आहे. परंतु, या दिवसांत आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या आजाराच्या बातम्या ऐकायला मिळतात. अतितापमानामुळे पक्षी, प्राणी आणि माणसांच्या जीवाला धोका निर्मानकरणारी स्थिती उद्भवते. *उष्माघात* यामुळे दर वर्षी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. नुकतेच, एका सार्वजनिक कार्यक्रमाप्रसंगी, १३ जणांचे उष्माघाताने दगावल्याची बातमी वाचण्यात आली. घडलेला प्रकार अत्यंत वेदनादायी आहेच, परंतु, असे कुणाच्या बाबतीत पुन्हा होऊ नये, म्हणून त्याबाबत थोडेसे माहितीपर लिखाण करून, एखाद्याचे प्राण वाचवता आले तर, त्यासारखे पुंण्याचे काम नाही. असे वाटले म्हणून आजचा हा लेख.
मानवी शरीराचे तापमान ३७° अंश सेल्सियसवर स्थिर असते. मेंदूतील हैपोथॅलॅमस नावाचा भाग याचे नियंत्रण करतो. कोर तापमान आणि बाह्य तापमान असे दोन प्रकार असतात. कोर तापमान म्हणजे शरीरातील अवयवांचे, रक्ताचे, आणि खोल भागाचे तापमान, तर बाह्य तापमान म्हणजे त्वचा आणि त्वचेच्या खालच्या भागाचे तापमान. कोर तापमान स्थिर असते, तर बाह्य तापमानात थोडाफार बदल होत असतो.
एखाद्या आजारामुळे, विकारामुळे किव्हा परिस्थितीमुळे कोर तापमानात वाढ झाली, तर हैपोथॅलॅमस कार्यरत होते, आणि त्वचेद्वारे घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढले जाते. ते पाणी शरीराबाहेरील उष्णतेमुळे भाषपात रूपांतरित होऊन शरीरातील उष्णता शोषली जाते, व कोर तापमान कमी होते. आपल्या घरातील माठाचे पाणी थंड होण्यासाठी हेच नैसर्गिक तंत्र कारणीभूत असते. माठातून पाणी बाहेर झिरपते, त्याचे भाषपिभुवन होताना माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषली जाते, म्हणून आतले पाणी थंड होते. तसेच तंत्र शरीरातील तापमान कमी करण्यासाठी वापरले जाते.
उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढते, विशेषतः ३८° अंशापेक्षा अधिक होते, तेव्हा शरीराचेही तापमान वाढू लागते. परंतु, वरील तंत्र कार्यरत होऊन तापमान नियंत्रित केले जाते. अशा वाढलेल्या तापमानात जास्त काळ उन्हात राहिल्याने घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, व कालांतराने घामही येणे बंद झाल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. रुग्णाचे अंग गरम लागते (ताप येतो). अशा वाढीव तापमानात शरीर क्रिया योग्य पद्धतीने कार्य करत नाही.
शरीरात काही बदल घडून जीवाला धोका निर्माण होतो व त्यावर तातडीने उपाय न केल्यास मृत्यूही होऊ शकतो. नेमकं काय घडतं, कसं घडतं आणि ते कसं ओळखावं, काय उपाय करावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे काही होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, ही माहिती जर आपल्याला मिळाली तर किती उपयोगी होईल, नाही का ? म्हणून ही माहिती तुम्ही इतरांनाही पाठवू शकता, त्यांचेही प्राण वाचवण्यास मदत होईल.
सर्वप्रथम पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरीरातून बाहेर पडणारे द्रव सुकतात, उदा. घाम, लघवी, तोंडातील लाळ, डोळ्यातील पाणी कमी झाल्याने तोंडाला आणि घशाला कोरड पडणे, लघवी गडद रंगाची होऊन गरम पडणे, त्वचा कोरडी पडणे, डोळे कोरडे पडून चुरचुरणे अशी लक्षणे दसू लागतात. पाणी कमी पडल्याने रक्त घट्ट होण्यास सुरुवात होते. रक्त घट्ट झाल्याने रक्तभिसरण गती कमी होते.
त्यामुळे मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर या महत्त्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा कमी प्रमाणात होतो. मेंदूला रक्त कमी झाल्याने अशक्तपणा येणे, अंधारी येणे, चक्कर येणे, गोंधळणे, गांगरणे, चालतांना तोल जाणे, बेशुद्ध होणे, झटके येणे असे परिणाम दिसतात. रक्त आणखीच जास्त घट्ट झाले तर रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यामुळे पॅरालिसिस, कोमा, हार्ट अटॅक, कार्डिअक अरेस्ट होतो. पाण्यासोबत शरीरातील क्षार कमी होतात. यामुळे शरीरातील विविध प्रक्रियांवर परिणाम होतो. एकंदरीत काय तर, शरीरक्रियाचा बॅलन्स बिघडतो, आणि त्यामुळे काही तासात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
अशा उष्ण वातावरणात गेल्यानंतर वरीलपैकी काहीही लक्षणे आढळले तर, क्षारयुक्त पाणी (मीठ साखर पाणी, सरबत) घ्यावे. मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. ताप कमी करण्यासाठी ओल्या कपड्याने अंग पुसावे. मान, गळा, बगलेत किव्हा जांघेत बर्फ ठेवावा. उन्हातून सावलीत यावे. थंड हवेशीर जागेत यावे. जर लक्षणे तीव्र स्वरूपाचे असल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये जावे. तिथे रुग्णाला सलाईन द्वारे द्रव दिले जाते. ताप कमी करण्यासाठ अंगावरील तंग कपडे काढले जातात.
लूज सुती कपडे घातले जातात. ओल्या कपड्याने अंग पुसले जाते, किव्हा पाण्याने अंग ओले केले जाते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी, की ताप कमी करण्यासाठी क्रोसिन, डोलो, पॅरासिटामॉल सारखे औषधे देऊ नये. इलेक्टरॉल पावडर, ओ.आर.एस. पावडर मिश्रित पाणी दिले जाते. इतर काही लक्षणे असल्यास त्यानुसार रुग्णाचा इलाज केला जातो. वेळेत इलाज सुरू झाल्यास प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते, म्हणून कुठलाही वेळ न घालवता तातडीने कारवाई करणे आवश्यक असते.
उष्मघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि काळजी घेण्याची गरज असते. जी लोकं उष्ण आणि दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात रहातात, त्यांच्यासाठी तर अगदी महत्वाचं आहे. उष्ण आणि दमट वातावरणात घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. अकारण उन्हात जाऊ नये, जाण्याची वेळ आलीच तर ऊन लागू नये म्हणून डोक्यावर टोपी, छत्री, कपडा, स्कार्फ बांधावा. अंगावर हलके, लूज, सफेद, सुती कपडे घालावे. तंग, सिनथेटिक व गडद रंगाचे कपडे घालू नये.
चालतांना सावलीतून चालावे, झाडाखाली बसावे. उन्हात उभ्या असलेल्या गाडीत बसू नये. सोबत मुबलक पाणी असावे, अधून मधून पाणी प्यावे. पाण्याने तोंड, हात-पाय धुवावे. मानेभोवती ओला कपडा ठेवावा. घरी आल्यानंतर थंड सरबत प्यावा. आंबा, टरबूज, द्राक्ष, संत्री यासारखे रसदार फळं खावे. गरजेनुसार घरात कुलर, फॅन, ए.सी. लावावे. लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, कारण यांना लवकर बाधा होऊ शकते. थोडाही निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, म्हणून त्वरित कृती करा.
*
ReplyForward
|