नामको बॅंकेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ धात्रक यांचे निधन

नाशिक : सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, नामको बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि डोंगरे वसतिगृहाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ (नाना) लक्ष्मण धात्रक यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांचे ते वडील होत.
हरिभाऊ उर्फ नाना यांचा जन्म ११ जानेवारी १९३३ रोजी स्वातंर्त्यपूर्व काळात झाला. त्यांचे मूळ गाव दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड. व्यवसायानिमित्ताने धात्रक कुटुंब नाशिक मधील पंचवटीत स्थिरस्थावर झाले. स्वातंर्त्य चळवळीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर राहिला. सुरुवातीला पारंपारिक वखारीचा व्यवसाय करणाऱ्या हरिभाऊ धात्रक यांनी पुढे बांधकाम क्षेत्रात जम बसविला. व्यवसाय करीत असताना त्यांनी अनेक सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले. डोंगरे विद्यार्थी वसतीगृहाचे ते अध्यक्ष होते. पुढे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या संस्थेचे देखील त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेवर 32 वर्षे ते संचालक होते. बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात बॅंकेचा विस्तार केला. डोंगरे विद्यार्थी वसतीगृह व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था एकत्रीकरणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष तसेच रिमांड होम या संस्थेवर पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. बुधवारी सायंकाळी नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजिक, राजकीय, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *