बच्चू कडूंच्या आंदोलनात दिव्यांगबांधवांचा सहभाग, व्यापार्यांचाही पाठिंबा
निफाड : विशेष प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे गेल्या काही दिवसांपासून अमरावती येथील मोझरीत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत निफाड तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दोन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर 12 व 13 जूनला हे आंदोलन सुरू असून, शेकडो दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत आवाज बुलंद केला आहे. मोझरीसारख्या दूरच्या ठिकाणी सर्वच दिव्यांग बांधव जाऊ शकत नसल्यामुळे, निफाडमध्येच आंदोलन करून बच्चूभाऊंच्या लढ्याला हातभार लावण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. आजच्या आंदोलनात सोमनाथ धुमाळ, अनिल भावसार, बापू राऊत, नवनाथ घोटेकर, बाळू वाकचौरे, संजय विसपुते, ज्ञानेश्वर आढाव, विलास भालेराव, रामा गव्हाणे, बाळासाहेब दुसाने, गोरख उगले, ज्ञानेश्वर उगले, सुनील गोराडे, संजय सदाफळ, अंबादास तासकर, अंबादास गायकवाड, सागर धुमाळ, लक्ष्मण बैरागी, सूरदास पावशे, उषा सूर्यवंशी, संगीताताई राजगिरे, फकीरा सूर्यवंशी, प्रकाश वाघ, शितल पानपाटील, चित्रा वाघ, उज्ज्वला कुशारे, सतीश कुमावत, कृष्णा कांबळे, जनाबाई चव्हाण, संजय कापसे, बाळासाहेब साळुंखे, रोशन तिडके, रोशन सानप, अविनाश पगार, रामदास शिंदे, अनिल खैरे, मुस्ताक पठाण, सोमनाथ वाघ, संदीप पवार यांच्यासह निफाड, लासलगाव, टाकळी विंचूर, विंचूर, साकोरे, उंबरखेड, पिंपळगाव बसवंत, पिंपरी, चांदोरी, देवगाव, कसबे सुकेणे, रानवड, नांदुर्डी, कोकणगाव आदी गावांतील शेकडो दिव्यांगबांधव उपस्थित होते.
चांदवडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
चांदवड : वार्ताहर
प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 8 जूनपासून सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि.12) चांदवड तालुक्यात प्रहार संघटनेने पुकारलेल्या एकदिवसीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शहरात शांततेचे वातावरण होते आणि बंद शांततेत पार पडला.
बंदच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि कर्मचार्यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले होते. शहरातील गल्लोगल्लीत आणि दुकानदारांसमोर हात जोडून विनंती करत, बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, गणेश पाचोरकर, चंद्रकांत जाधव, ललित उशीर, गणेश तिडके, शंकर गोदरे, ज्ञानेश्वर ठाकरे, संदीप आहेर, बंशीलाल कासव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहारचे युवाप्रमुख चंद्रकांत जाधव आणि हारसिंग ठोके हेदेखील या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होते. बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार प्रहार संघटनेच्या पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला होता.