बिबट्याचा मानवी वस्तीकडे शिरकाव

जंगलाचा र्‍हास; ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी येथील आदिवासीबहुल भागात बिबट्या या हिंसक प्राण्याने मोठा तांडव सुरू केला आहे. काही जणांना आपला जीव गमवावा लागला असून, बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले आहेत. याबाबत वन विभागाने दक्ष भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिंडोरीसह सुरगाणा, पेठ ही तालुके जंगलमय असून, येथील जंगलांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने प्राणिमात्रांचा र्‍हास होत असल्याने, जंगलातील हिंसक प्राण्यांना अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे पलायन करावे लागत आहे. बिबट्याने मानवी वस्तीत जाऊन दिंडोरी येथील चिमुरड्यासह वनारवाडी येथील एक मुलीला भक्ष्य बनविले. त्यामुळे अशा बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. बिबट्या हा एक नसून, अनेक आहेत व ते मानवी वस्तीत प्रवेश करून बिनधास्तपणे सावज टिपत असल्याने दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड, घोटी, इगतपुरी, सुरगाणा, पेठ अशा अनेक भागांमध्ये दहशत आहे. पाळीव प्राण्यांवर त्यांची करडी नजर असल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. याबाबत बिबट्यांसंदर्भात अनेक बैठकीही घेतल्या जात असून, विचारमंथन केले जात आहे. दिंडोरी येथील घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खा. भास्कर भगरे यांच्या विचारविनिमयानंतर वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अधिक दिसून येत आहे, त्या ठिकाणी सायरन अशा पद्धतीची अंमलबजावणी केली आहे.
बिबट्याचे हल्ले वारंवार होत असून, सदर बिबटे रात्रीच्या वेळेस अधिक बाहेर पडत असून, याचवेळी आपले भक्ष्य टिपत असल्याने वन विभागाने रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये, असा सल्लाही दिला आहे. याबाबत शेतकर्‍यांनीही दखल घेणे गरजेचे आहे. कारण शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये, आपल्याजवळ बॅटरीचा वापर करावा, असे आवाहनही वन विभागाने केले आहे.

नर-मादीच्या अनेक जोड्या
गेल्या दहा वर्षांपासून बिबट्यांनी जंगल सोडून दिल्यामुळे ते उसाच्या शेताचा आसरा घेताना दिसत आहे. सध्या नर-मादी बिबट्याच्या अनेक जोड्या उसात बागडत असताना अनेकांना दिसून आले आहे. त्यामुळे जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण दिसून येत आहे. दिंडोरी तालुक्यात कोलवण नदीला बारमाही मुबलक पाणी व वास्तव्यासाठी उसाची शेती यामुळे हे बिबटे वावरताना दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *