नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , ज्यामध्ये त्या एका महिला अधिकाऱ्याला पाणी देताना दिसत आहेत . केंद्रीय मंत्र्यांच्या या कृतीचे जोरदार कौतुक होत आहे . नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भाषण देत होत्या . त्यावेळी ही घटना घडली . पद्मजा चंदुरू यांनी भाषणादरम्यान पाणी मागितले . त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन त्यांच्याकडे पोहोचल्या .कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये चंदुरू त्यांच्या भाषणाच्या मध्येच थांबतात आणि पाणी मागतात . पाण्याकडे इशारा केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन व्यासपीठावर पोहोचल्या . त्यांनी बाटलीमधून पद्मजा यांना ग्लासात पाणी दिले . त्यानंतर पद्मजा यांनी आपले भाषण चालू ठेवले . या कृतीने भारावून , चंदुरू यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आणि सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या . ही घटना एनएसडीएलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाशी संबंधित आहे . अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी एनएसडीएलचा गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम ‘ बाजार का एकलव्य ‘ लाँच केला .