गावभर अफवांचा बाजार; नागरिकांचा जागता पहारा, बंदोबस्ताची मागणी
निफाड :प्रतिनिधी
गेल्या काही दशकांपासून निफाड तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर असताना शेळ्या, मेंढ्या आणि लहान बालके बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मात्र, यावर्षी बिबट्याने संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्षेत्र बनविल्याने अवघा जिल्हा बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे. साहजिकच नागरिक सायंकाळी घराबाहेर पडण्याचे टाळू लागल्याने याचाच गैरफायदा उठवत भुरटे चोरटे शेती औजारे, विद्युत पंप, मोटारसायकल अन् आता चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. चोरट्यांच्या भीतीमुळे म्हणा किंवा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणा; परंतु नागरिकांना
आता जागता पहारा द्यावा लागत आहे.
यंदा चोरांची पर्वणी सुरू झाली ती म्हणजे भेंडाळी, महाजनपूर परिसरात. निफाड, शिवरे, कोठुरे, नांदूरमध्यमेश्वर या गावांतदेखील चोर येत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. अलीकडे निफाड शहरातदेखील चोरीच्या काही घटना घडल्या आहेत. कोळवाडी रोडलगत राहणारे रमेश जाधव यांच्या वस्तीवरील महिलेची गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेत अज्ञात महिला भरदुपारी पसार झाली. नैताळे येथे चोरट्यांनी हातोहात मोटारसायकल लांबविली, तर येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमधून चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपये किमतीची तार लांबविली, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
एकीकडे पावसाचे थैमान, तर दुसरीकडे चोरांचा सुळसुळाट. त्यात तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत असल्याने वस्तीवर राहणारे नागरिक दिवस मावळताच दारे, खिडक्या बंद करू लागले आहेत. परिणामी, याचाच गैरफायदा घेत चोरटे वस्तीवरील वस्तू लांबवू लागले आहेत. तालुक्याच्या गोदाकाठ भागातून आत्तापर्यंत शेकडो बिबटे जेरबंद केलेले असले, तरीदेखील अद्यापपर्यंत बिबट्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे बिबट्यापासून पाळीव जनावरांचे आणि लहान मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असतानाच आता शेतीपयोगी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकर्यांची अवस्था म्हणजे
सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही, अशी झाली आहे.
सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहे. मात्र, बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे मजूर मिळेनासे झाल्याने ही कामे खोळंबू लागली आहे. त्यातच काही ठिकाणी चोर्या, तर कुठे अफवा यामुळे दहशतीखाली असणार्या नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच वन विभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी.
-संजय धारराव, निफाड