राज्य सरकारकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’चा मसुदा जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात फ्लॅट घेणार्यांसाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी कागदपत्रीय अडचण आता सुटण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत तुमच्या फ्लॅटखालच्या जमिनीवर नाव असायचे बिल्डरचे, जमीनमालकाचे किंवा सोसायटीचे. तुमच्याकडे असायचे फक्त शेअर सर्टिफिकेट, सेल डीड आणि सोसायटीचे पत्र. आता प्रत्येक फ्लॅटला
स्वतःचा स्वतंत्र सरकारी अधिकार अभिलेख मिळणार आहे. त्याला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असे नाव दिले जाणार आहे. थोडक्यात, आता फ्लॅटधारकही बिल्डिंगच्या जमिनीचे मालक बनणार आहेत.
महसूल विभागाने यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत ‘इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करणे आणि देखरेख करणे नियम, 2026’ याचा मसुदा जाहीर केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची माहिती दिली. या मसुद्यावर 30 दिवसांत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. हरकती आल्यावर अंतिम नियम होतील आणि मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रायोगिक टप्प्यात अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी सांगितले की, डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून पायलट सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
हे कार्ड म्हणजे तुमच्या फ्लॅटचा ‘आधार’च समजा. आधी इमारतीचा आणि सामाईक क्षेत्राचा मुख्य अभिलेख तयार होईल, मग प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र पूरक अभिलेख तयार होईल. नगर भूमापन क्षेत्रासाठी डी-1 आणि डी-2 नमुने, तर ग्रामीण आणि इतर भागांसाठी गाव नमुना 7-क आणि 7-ड नमुने वापरले जाणार आहेत.
फायदा काय?
बँकेला एकाच अधिकृत कागदावर मालकी, जमिनीतील हिस्सा आणि बोजा दिसेल, त्यामुळे टायटल सर्चचा वेळ वाचेल. कोणाचा जमिनीत किती हिस्सा आहे, हे स्पष्ट असल्याने बिल्डरशी वाटाघाटीत फसवणूक कमी होईल. वारसा हक्क, विक्री यासाठी कोर्ट-कचेरी आणि अनेक कागदपत्रांची गरज कमी होईल. एकाच फ्लॅटची दुहेरी विक्री, एकाच मालमत्तेवर अनेक कर्जं – हे प्रकार उघड होतील.
जुन्या सोसायट्यांचे काय?
नवीन इमारती आणि महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांसाठी हे कार्ड आपोआप तयार होईल. जुन्या सोसायट्यांना मात्र अर्ज करावा लागेल. ग्रामीण भागात तर अडचण आणखी मोठी आहे – एकाच गट नंबरवर किंवा 7/12 वर अनेक घरं असतात, पण प्रत्येक घराचा स्वतंत्र अभिलेख नसतो. हा मसुदा तीही अडचण
सोडवणार आहे.
Now, flat owners are also owners of the building’s land!