राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांचे प्रत्युत्तर
नाशिक : प्रतिनिधी
आगामी काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, उद्याचा पराभव दिसत असल्याने विरोधक मतचोरीचे आरोप करत आहेत. राज ठाकरेंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत, त्यांनी केलेले आरोप तोंडी चालत नसतात, असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
काल (रविवारी) सहकारी पतसंस्थांच्या कार्यशाळेसाठी नाशिकला आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काही प्रश्न मुद्दाम पुढे आणले जात आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात पदाधिकार्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांना मते मिळतात, मात्र ती मते लाटली जातात. मतचोरी झालेली आहे, असा आरोप केला होता. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, आरोप असे तोंडी चालत नसतात. निवडणूक हरल्यानंतर अशी कारणे ते देत आहेत. येत्या काही महिन्यांत राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात खरी ताकद त्यांना कळेल. केंद्र आणि राज्य सरकार विकासावर काम करत आहे. त्यांना पराभव दिसत आहे म्हणून असे काही प्रश्न पुढे आणत आहेत, असे दरेकर यावेळी म्हणाले.
खा. सुळेंवरही टीका
खासदार सुप्रिया सुळे यांनी खेडगाव (ता. दिंडोरी) येथे मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, त्यांना हे शोभत नाही. कोणी काय खायचे ते खा, बंदी नाही. मात्र, आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आहे, एवढे लक्षात असू द्यावे.