डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल
♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत
♦ अपहरण व पुरावा
♦ नष्ट केल्याप्रकरणी
♦ प्रत्येकी 7 वर्षे
♦ सश्रम कारावास

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील जलदगती न्यायालयाने आरोपी विजय खैरनार (वय 24) याला फाशी सुनावली. जलदगती न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांनी शुक्रवारी (दि. 16) हा निकाल दिला. या निकालाकडे पीडित बालिकेचे कुटुंबीय, डोंगराळे ग्रामस्थ तसेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती.

या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला बालिकेचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर बुधवारी (दि. 7) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिक्षेबाबतचा निकाल राखून ठेवला होता. शुक्रवार सकाळी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावून या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला.
लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणी फाशी सुनावतानाच अपहरण तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई केली आहे. आरोपी विजय खैरनार अटक झाल्यापासून कारागृहात आहे. प्रकरणाची संवेदनशीलता आणि न्यायालय परिसरातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुनावणीच्या वेळी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले. शुक्रवार अंतिम निकालाच्या वेळीही आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयासमोर हजर करण्यात आले. निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाल्याने परिसरात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे निकाल जाहीर होताना न्यायालयात उपस्थित होते. बालिका आरोपीला ‘दादा’ म्हणून ओळखत होती. या विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिला सोबत नेल्याचा मुद्दा सरकार पक्षाने मांडला.
16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी बालिका डोंगराळे येथे मित्रांसोबत खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले, त्यानंतर तिला नेहरू पुतळ्याजवळ सोडल्याचे तपासातून समोर आले होते. बालिकेला सोबत नेताना आपल्याकडे कुणाचे लक्ष आहे का, कुणी त्याला विरोध केला आहे का, याची आरोपीने चाचपणी केल्याचा युक्तिवादही सरकार पक्षाने केला. यावरून आरोपी आपल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव असलेला आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिचा मृतदेह जवळच्या मोबाइल टॉवर परिसरात फेकून देण्यात आला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केल्याचा आरोप तपासात करण्यात आला होता. वैद्यकीय पुराव्यांमधून बालिकेला गंभीर दुखापत व रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सरकार पक्षाने न्यायालयात मांडले. ही घटना केवळ लैंगिक अत्याचाराची नसून, अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेली हत्या असल्याचे सांगत सरकार पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मालेगाव तालुका पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी विजय खैरनार याला अटक केली. त्यानंतर तपास पूर्ण करून घटनेनंतर 23 दिवसांत सुमारे 425 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन शासनाने या खटल्यासाठी प्रख्यात विधिज्ञ एड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. अ‍ॅड. निकम यांना अ‍ॅड. संजय सोनवणे, अ‍ॅड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि अ‍ॅड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. पोलिस तपास पथकाने संकलित केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी सरकार पक्षाने न्यायालयासमोर मांडली. 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात आले. सुमारे 11 महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. 30 सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याच्यावरील अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खुनाचे आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर अंतिम सुनावणी झाली. 7 ऑक्टोबर रोजी एड. उज्ज्वल निकम यांनी फाशीच्या शिक्षेसाठी सरकार पक्षाची बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाचे आभार मानत पुष्पहार अर्पण
आरोपी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने न्यायालयाचे आभार मानण्यात आले. न्यायालयाच्या पायरीवर पुष्पहार अर्पण करून या निकालाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. या खटल्यात प्रभावी बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अ‍ॅड. सोनवणे, फिर्यादी पक्षाचे वकील अ‍ॅड. हर्षल तिवारी तसेच अ‍ॅड. नूपुर शर्मा-ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात आले. बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा, सरकारी पक्ष व न्यायालयाने बजावलेल्या भूमिकेबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निखिल पवार, भरत पाटील, कैलास तिसगे, विवेक वारुळे, मनोज पाटील, दीपक पाटील, नीलेश रोकडे, संदीप ठाकरे आदी उपस्थित होते.

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरण : टाइमलाइन
♦ 16 नोव्हेंबर 2025 – चिमुकली बेपत्ता; मृतदेह आढळला. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांची बालिका बेपत्ता झाली. शोधादरम्यान गावालगतच्या झाडाझुडपांत तिचा मृतदेह आढळला.
♦ 16 नोव्हेंबर 2025 – विजय खैरनारला अटक. पोलिसांनी विजय खैरनार (24) याला संशयित म्हणून अटक केली. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.
♦ 17 नोव्हेंबर 2025 – ग्रामस्थांचे आंदोलन
दोषीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
♦ 9 डिसेंबर 2025 – दोषारोपपत्र दाखल
पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 23 दिवसांत 425 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
♦ 2026 – खटल्याची सुनावणी
विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून सरकार पक्षाने पुरावे सादर केले. खटल्यात 24 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
♦ 7 सप्टेंबर 2026 – अंतिम युक्तिवादाला सुरुवात. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवाद सुरू केला.
♦ 21 सप्टेंबर 2026 – अंतिम युक्तिवाद पूर्ण. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.
♦ 30 सप्टेंबर 2026 – दोष सिद्ध. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने विजय खैरनार याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निकाल दिला. शिक्षेचे स्वरूप निश्चित करण्यासाठी विविध अहवाल मागविण्यात आले.
♦ 7 ऑक्टोबर 2026 – अंतिम शिक्षेबाबत युक्तिवाद. न्यायालयाच्या आदेशानुसार विविध अहवाल सादर. त्यावरून दोन्ही बाजूंकडून अंतिम शिक्षेबाबत युक्तिवाद
♦ 16 ऑक्टोबर 2026 – फाशीच्या शिक्षेची घोषणा. न्यायालयाने दोषी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. दोन स्वतंत्र गुन्ह्यांत प्रत्येकी सात वर्षांचा कारावास आणि पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले.

चोवीस साक्षीदारांची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावा प्रभावी
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही तपास यंत्रणेने परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडली. सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवादात आरोपीविरुद्ध असलेल्या विविध परिस्थितीजन्य पुराव्यांची सांगड घालत आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. विशेषतः सातवर्षीय बालसाक्षीदाराची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. बालसाक्षीदाराच्या साक्षीला इतर साक्षीदारांच्या साक्षी, तसेच उपलब्ध पुराव्यांची पुष्टी मिळत असल्याचे सरकार पक्षाने न्यायालयासमोर मांडले होते.

‘फाशीही कमी ठरेल’ असा युक्तिवाद
आरोपीला फाशीची शिक्षा का द्यावी, यासाठी सरकार पक्षाने
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे संदर्भ न्यायालयासमोर मांडले. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सुमारे 45 मिनिटे विविध न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत आरोपीच्या कृत्याचे गांभीर्य स्पष्ट केले होते. आरोपीची गावातील वर्तणूक, कारागृहातील वर्तन आणि मानसिक स्थिती यासंदर्भातील अहवालही न्यायालयासमोर मांडण्यात आले. आरोपीचे वर्तन समाधानकारक नसल्याचे अहवालातून स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणातील गुन्ह्याचे स्वरूप, बालिकेचे वय, अत्याचाराची पद्धत आणि त्यानंतर करण्यात आलेली हत्या या सर्व बाबींचा विचार करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकार पक्षाने केली होती.

पीडित चिमुकली आरोपीला ’दादा’ म्हणायची आणि ती त्याच्यासोबत विश्वासाने गेली होती. मात्र, आरोपीने या पवित्र नात्याचा खून केला. या प्रकरणाची उच्च न्यायालयात लवकर सुनावणी होऊन फाशीची शिक्षा कायम होईल, अशी आशा आहे.
– अ‍ॅड. उज्ज्वल निकम

डोंगराळे प्रकरणात न्यायालयाचा अतिशय चांगला निर्णय आहे. अशा प्रकारच्या लोकांना वेळीच थांबवले पाहिजे. कायद्याची ही प्रक्रिया झालीच पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये सहा महिन्यांच्या आत निर्णय लागला पाहिजे जेणेकरून संबंधितांना योग्य तो संदेश जाईल.
– गिरीश महाजन, पालकमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *