सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमसमोर शालेय बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दुसरा युवकही गंभीर जखमी
झाला आहे.
या घटनेत गणपत पाटील (वय 65, रा. पाथर्डी फाटा) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा मयूर गणपत पाटील जखमी झाला आहे. जखमीस तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजची शालेय बस (क्रमांक एम.एच.15 ए.के.1038) ही पाथर्डी फाटाकडून राजे संभाजी स्टेडियमकडे जात असताना, बसचे अचानक ब्रेक फेल झाले. बसमध्ये विद्यार्थी नसल्याची प्राथमिक माहिती आहे. चालक दिलीप गंगाधर गांगुर्डे (वय 48, रा. जेलरोड) याने बसवरील नियंत्रण गमावले आणि समोर चाललेल्या दुचाकी (क्रमांक एम.एच.14 बी.यू. 8134) ला जोरदार धडक दिली. दुचाकीसमोर असलेल्या आयशर ट्रकला दुचाकी जाऊन धडकल्याने गणपत पाटील यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेले त्यांचे पुत्र मयूर पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह बाळा दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस वाहन तात्काळ दाखल होऊन जखमीस पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.