नांदूर नाका हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्तात वाढ

    उद्धव निमसेंच्या अडचणींत वाढ
♦   वडार समाज आक्रमक
♦   नांदूर नाका भागात दुकाने बंद

पंचवटी : प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील गंभीर जखमी राहुल संजय धोत्रे याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.29) सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारीच निर्णय होणार होता.
बैल पोळ्याच्या दिवशी गेल्या शुक्रवारी (दि.22) सायंकाळी जनार्दननगर (नांदूर नाका) परिसरात किरकोळ कारणावरून दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात राहुल धोत्रे व त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर गंभीररीत्या जखमी झाले होते. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी युवकांवर निर्दयपणे कोयत्याने वार होत असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी माजी नगरसेवक उद्धव निमसे, पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्नील बागूल, सुधीर निमसे, अक्षय अशोक पगार, मेघराज जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन जगताप, सुमित हांडोरे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांपैकी मेघराज सुनील जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन लक्ष्मण जगताप, अक्षय अशोक पगार, सुधीर ऊर्फ गोटीराम माधवराव निमसे यांना अटक करण्यात आली होती.
शुक्रवारी (दि. 29) सकाळी राहुल धोत्रे याचे निधन झाल्याचे वृत्त येताच नांदूर नाका परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ केली आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. या अर्जावर शुक्रवारीच अंतिम सुनावणी होणार होती; परंतु आता राहुल धोत्रे याच्या निधनाने या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लागल्याने भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. आडगाव पोलिसांनी उद्धव निमसेंसह इतर फरारींच्या शोधासाठी पथके पाठवली असल्याचे आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी सांगितले.

जखमी राहुल धोत्रे याचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तणावामुळे या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीदेखील याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फरार संशयितांना तत्काळ अटक करा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, वडार समाज प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, अ‍ॅड. सरोजित बनसोडे, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, सम्यक विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संशयितांवर मोका, अ‍ॅट्रॉसिटी लावून फरार संशयितांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. यावेळी वडार समाजाचे जवळपास तीनशे ते चारशे समाजबांधव व धोत्रे कुटुंबीय उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *