उद्धव निमसे यांना अटक करण्याची वडार समाजाची मागणी

पंचवटी : प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात दोघा युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपाचे संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे स्पष्ट दिसत आहेत, त्यांनी चिथावणी दिल्याने प्राणघातक हल्ला झाला असून, जखमी व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये संशयित उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद आहे. संशयित गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात येऊन गुन्हेगारांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश आव्हाड यांच्यासह वडार समाजबांधवांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी (दि.22) निमसे गटाने जनार्दननगरात प्रवेश करत धोत्रे गटातील राहुल धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर धारधार शस्त्र, दांडके व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. निमसे गटाने जनार्दननगरात घातलेला हैदोसचे सीसीटीव्ही फुटेज विविध सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, जवळपास सात संशयित ताब्यात आहेत. याप्रकरणी गुरुवार (दि. 28) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश आव्हाड यांच्यासह वडार समाजबांधवांनी आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांची भेट घेतली. यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील भाजपाचे संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे समाजमाध्यम व सोशल मीडियावर अ‍ॅॅक्टिव्ह होते.त्यावेळी त्यांना अटक का झाली नाही. तपासात चार्जशीटमध्ये काही उणिवा राहू नयेत याबाबत चर्चा झाली. संशयित निमसे यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी आणि धोत्रे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

नांदूर नाका येथे राहुल धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास कुणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्षपातीपणे करण्यात यावा. हा हल्ला संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृती करणारा आहे. या गुन्ह्यामागे हात असलेल्या संशयितांना त्वरित अटक करण्यात येऊन त्या गुन्हेगारांवर मकोकाअन्वये कारवाई करावी.
– अ‍ॅड. सुरेश आव्हाड, जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *