ग्रामीण पोलिसांची कारवाई; सात संशयितांना अटक
इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वाडीवर्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ शिवारात अवैध जिलेटिनचा साठा जप्त केला. पोलीस पथकाने सात संशयितांना अटक करीत कारवाई केली.
अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे 1 सप्टेंबरला वाडीवर्हे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ शिवारात काही ठिकाणी घरात, तसेच शेडमध्ये अवैध जिलेटिनसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वाडीवर्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने नाशिक ग्रामीण श्वानपथक व बॉम्बशोधक पथकासह पंचांसमक्ष छापा टाकला. सारूळ शिवारात संशयितांच्या राहत्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त जिलेटिनसारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरीत्या आढळून आले. कारवाईत गोरख बाजीराव ढगे (वय 34, रा. सारूळ, ता. जि. नाशिक), विकास नवले (रा. सारूळ, ता. जि. नाशिक), ओंकार कैलास नवले (वय 23, रा. सारूळ, ता. जि. नाशिक), दीपक दशरथ क्षीरसागर (वय 32, रा. शिंगवे बाहुला, देवळाली कॅम्प), गौरव मोहन नवले (वय 32, रा. सारूळ), अमित अजमेरा (पूर्ण नाव माहीत नाही), कोठावदे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. वाडीवर्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, एकनाथ भोईर, सुनील शिंदे, अंमलदार सुभाष धुळे, रावसाहेब शिंदे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ, सचिन कदम, तुषार कापडणीस, रविराज जगताप यांचे पथक तपास करीत आहेत.
95 हजारांचा साठा जप्त
कारवाईत जिलेटिनच्या कांड्या भरलेले 49 बॉक्स. त्यात एकूण 6,125 जिलेटिनच्या कांड्या, 2200 इलेक्ट्रिक डेटोनेटर, 150 मीटर डी. एफ. वायर असा एकूण 95,750 रुपये किमतीचा साठा जप्त केला.