गावठी कट्ट्यासह 11 दुचाकी जप्त

पवारवाडी पोलिसांची कारवाई; दोन संशयित ताब्यात

मालेगाव : प्रतिनिधी
पवारवाडी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघा आरोपींसह एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व 11 मोटारसायकली जप्त केल्या.
दरेगाव शिवारातील धुलिया स्टील फर्निचर या दुकानाजवळ संशयित काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेख अझरुद्दीन शेख शाहबुद्दीन उर्फ अझहर बाली (रा. नॅशनल पंप पाठीमागे, के. डी. पार्क, मालेगाव) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. तर दुसर्‍या कारवाईत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरी प्रकरणातील संशयित मोहम्मद हुसेन जमील अहमद (रा. आयशानगर, भंगी कॉलनी, मालेगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने पवारवाडी छावणी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे यांसह 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राहुल खताळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, नीलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आदींचा समावेश होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *