’समृद्धी’वरून मुंबईला निघताय? आधी ब्लॉकच्या वेळा पाहा!

♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध

♦ दिवसातून तीन वेळा एक तास वाहतूक बंद

नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून मुंबईला जाण्याचे नियोजन करताय? मग आधी वाहतूक ब्लॉकच्या वेळा तपासा. भरवीर ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 नोव्हेंबरपर्यंत दिवसातून तीन वेळा, प्रत्येकी एक तास बंद राहणार आहे. सोमवारपासून (दि. 26) सुरू झालेल्या या ब्लॉकचे आणखी 11 दिवस शिल्लक आहेत. बोगद्याजवळील डोंगर उतारांवरून दगड आणि खडक कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या या घाट विभागात डोंगर कापून रस्ता आणि बोगदे तयार करण्यात आले आहेत. या परिसरात यापूर्वीही डोंगर उतारांवरून दगड व खडक कोसळण्याच्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यानंतर सैल झालेले खडक रस्त्यावर कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी क्रेन आणि जड यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने कामादरम्यान वाहनांच्या सुरक्षिततेसाठी महामार्ग पोलिसांच्या परवानगीने वाहतूक थांबविण्यात येणार आहे.
हे निर्बंध केवळ मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेपुरते मर्यादित असून, इतर वेळेत वाहतूक सुरू राहील. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, नागपूर आणि विदर्भातून मुंबईकडे जाणार्‍या खासगी वाहनांसह प्रवासी बस आणि मालवाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे
नियोजन करावे.

Heading to Mumbai via the ‘Samruddhi’ expressway? Check the block timings first!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *