सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे नवीन नाशिक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दिशा दर्शवणार्या कमानींवर लावलेले अनधिकृत राजकीय बॅनर हटवण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे व विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित राखण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत फलक, पोस्टर आणि बॅनर हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज सकाळपासून धडक कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रमुख चौक, मुख्य रस्ते, दिशा दर्शक कमानी व सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय बॅनर अतिक्रमण विभागाने उतरवले. ही कारवाई शहराची शिस्त आणि सौंदर्य राखण्यासाठी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेत अतिक्रमण विभागप्रमुख निखिल तेजाळे, अधिकारी निवृत्ती कापडणे, रवींद्र काथोटे, सुनील हिरे तसेच विभागातील संपूर्ण कर्मचारीवर्ग सहभागी झाला होता. सर्वांनी समन्वय साधून ही मोहीम यशस्वी केली. नागरिकांकडून या कृतीचे स्वागत करण्यात आले असून, अशा मोहिमा नियमितपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या परवानगीशिवाय फलक, पोस्टर किंवा बॅनर लावणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांकडून दंड वसूल केला जाईल.असे अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे शहरातील शिस्त आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ही कारवाई केवळ नियमभंग करणार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसून, एकूणच नागरिकांचा हिताचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशाच मोहिमा पुढील काळातही सुरू राहतील, असा इशाराही अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांनी दिला आहे.