नाशिककरांच्या नशिबी अजूनही खड्डेच!

चार हजार खड्डे बुजविले, दोन हजार बाकी : मनपाचा दावा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांची यंदा खड्ड्यांनी पाठ सोडली नसल्याने अपघात होण्याबरोबर नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहेत. दरम्यान, बांधकाम विभागाने खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेतली. सोमवारपर्यंत 3,810 खड्डे बुजविल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे.अद्याप शहरात 1,926 खड्डे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकरांची खड्ड्यातून मुक्तता झाली नसल्याचे वास्तव आहे.
काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मुख्य रस्त्यांसह नागरी वसाहतींत असलेल्या रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहने नेताना जरा जपूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसामुळे रस्त्यांवर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठवून वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आदळत आहेत. परिसरातील सर्व उपनगरांसह जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, हिरावाडी रोड, दिंडोरी रोड, तारवालानगर, मेरी- रासबिहारी लिंक रोड, पेठरोड यांसह अनेक रस्त्यांवर पावसामुळे खड्डे निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरभर खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असताना 8 सप्टेंबरपर्यंत महापालिकेने 5,777 पैकी 3,810 खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही नाशकातील खड्डे दुुरुस्तीचे काम पाऊस उघडताच केले जातील, असे आश्वासन दिले आहे. नेमके खड्डे कधी बुजविण्यात येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनपाच्या बांधकाम विभागाच्या वतीने एमपीएम, जीएसबी, पेव्हर ब्लॉक अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीने खड्डे बुजविण्यात येतात. महापालिकेने विविध पद्धतींचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. त्यामध्ये जीएसबी टाकून 2,071 खड्डे, एमपीएमच्या माध्यमातून 846 खड्डे, तर पेव्हर ब्लॉक टाकून 215 खड्डे बुजवण्यात आले आहेत. उर्वरित खड्डेदेखील लवकरच बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते तयार करून दिले जाणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

खड्डे बुजविण्यावर पन्नास लाखांचा खर्च

दरवर्षी प्रत्येक विभागात खड्डे दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात येतो. तरीही खड्डे झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विभाग                  खड्डे          बुजविलेले                न बुजविलेले 
नाशिक पूर्व                  802                    560                         242
नाशिक पश्चिम           432                    156                          276
पंचवटी                        1378                  1052                        326
ना. रोड                        1655                  1407                       248
सातपूर                        477                   324                          153
सिडको                        992                   311                          681
एकूण                          5776                 3810                       1926

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *