माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले
राष्ट्रपती, पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कराच्या हाती सूत्रे
काठमांडू :
सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे नेपाळमधील परिस्थिती काल दुसर्या दिवशी आणखी चिघळली. माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांचे घर पेटवून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण करीत त्यांना पेटवून दिल्याने त्या गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. निदर्शक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवासस्थानाला आग लावली आणि सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. त्यांनी दोन माजी पंतप्रधानांच्या घरांवरही हल्ला केला. या सर्व परिस्थितीमुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि दुबईकडे पलायन केले. राष्ट्रपती रामचंद्र यांनीही राजीनामा दिल्याने आता नेपाळची सूत्रे लष्कराच्या ताब्यात गेली आहेत.
निदर्शकांनी काल माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पळून-पळून मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांना छातीवर लाथ मारताना दिसत आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादल्यामुळे तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली, तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.
नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली. तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करत तिथे नासधूस, तोडफोड केली. घरातल्या अनेक गोष्टी आंदोलकांनी लुटून नेल्याचं उघड झालं. दरम्यान ऊर्जामंत्री दीपक खडकांच्या घराबाहेर आंदोलकांनी नेपाळी चलनाच्या नोटा उधळल्या. संसदेच्या आवारात आंदोलक शिरल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना रोखलं. दुसरीकडं काठमांडूमध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरुन सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात घोषणा देत होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता सोमवारी सकाळपासून नेपाळचे सैन्यदल हे संपूर्ण काठमांडूमध्ये तैनात करण्यात आलं. सैन्यदलानं संसदेचा ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलक संसदेच्या परिसरात शिरल्यानंतर परिस्थिती चिघळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
शाह यांच्याकडे नेतृत्व जाणार
तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार आहे. बालेन शाह यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. बालेन शाह नेपाळी रॅपर, म्युजिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत. एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिले जात आहे. बालेन शाह यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता आहे. नेपाळची तरुण पिढी बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहे. बालेन शाह केवळ काठमांडूमध्येच नव्हे, तर संपूर्ण नेपाळमध्ये प्रसिद्ध आहेत आणि तरुण पिढी त्यांना जनरल झेड, असे संबोधत आहेत.
अनेक मंत्री देश सोडून पळाले
या सर्व निदर्शनादरम्यान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हेलिकॉप्टरची गर्दी पाहायला मिळाली. भैसेपती येथील नेपाळ सरकारच्या मंत्र्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांमधून त्रिभुवन विमानतळासाठी सुमारे एक डझन हेलिकॉप्टर रवाना झाले. मात्र, नेत्यांना पळून जाण्यासाठी हेलिकॉप्टर पुरवल्याच्या आरोपाखाली निदर्शकांनी सिम्रिक एअरलाइन्सच्या इमारतीलाही आग लावली.
आंदोलक मागे हटायला तयार नाहीत
सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचे जाहीर केलं. मात्र आंदोलक आता मागे हटायला तयार नाहीत.