समाजकल्याण सहायक आयुक्तांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
नाशिक : प्रतिनिधी
125 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील हिटलर गृहपाल विजयश्री बाबर यांना तत्काळ निलंबित करावे. वसतिगृहातील गंभीर गैरप्रकार थांबवावेत, या प्रमुख मागणीसह विविध तक्रारींचा पाढा वाचत बाबर यांच्या अमानवी वर्तनाचा निषेध सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासमोर तक्रारींचा पाढा मुलींनी वाचत निवेदन सादर करण्यात आले.
या सर्व प्रकारांमुळे वसतिगृहातील वातावरण असुरक्षित, तणावपूर्ण व शैक्षणिकदृष्ट्या अडथळा आणणारे झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे यांनी
दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, वंचित बहुजन युवा आघाडी महानगर महासचिव दीपक पगारे यांच्यासह धम्मगौतमी धिवरे, सूरज दीक्षा सुदाम, आदित्य बाळासाहेब निरभवणे, सूरज भालेराव, आशिष तेलगोटे व वसतिगृहाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निवेदनात गृहपाल बाबर या विद्यार्थिनींना वारंवार शिवीगाळ, अपमानास्पद शब्दांचा वापर करतात. वसतिगृहात दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असून, त्यात झुरळे, किडे, अळ्या, माती वगैरे आढळतात. मुलींसाठी आलेले दूध, अंडी, मटण, चिकन यातील काही हिस्सा बाबर त्यांच्या पाळीव कुत्र्यांना देतात. स्वयंपाकघर व वसतिगृहात अस्वच्छता असून, विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्या विद्यार्थिनींच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी त्यांना दाबून टाकतात, धाकदपटशा करतात. निधी व निर्वाह भत्ता यामध्ये अफरातफर होत असून, मुलींना योग्य हक्काचे पैसे मिळत नाहीत. वसतिगृहातील वातावरण असुरक्षित, तणावपूर्ण व शैक्षणिकदृष्ट्या अडथळा आणणारे झाले आहे.