सीए, तज्ज्ञ सल्लागारासह कायदेतज्ज्ञही नेमणार
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका प्रशासनाने आपला वाट्याचा हिस्सा देण्यासाठी मागील काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. यासाठी दोनशे कोटींचे नियमित म्युनिसिपल बॉण्ड (कर्जरोखे) व दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड (कर्जरोखे) उभारले जात आहेत. या प्रक्रियेसाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एका कॅपिटल बँकर संस्थेवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच स्वतंत्र सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट), कायदेशीर सल्लागार (लीगल अॅडव्हायझर) यांचीही नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याकरिता 40 लाखांचा खर्च येणार आहे.
येत्या दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेकडून व्यापक नियोजन सुरू करण्यात आले आहे. मनपाने आपला हिस्सा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपये ग्रीन बॉण्ड उभारत आहेत. या रकमेतून मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन प्रकल्पासह इतर पायाभूत सोयीसुविधांची उभारणी केली जाणार आहे. दुसर्या टप्प्यात आणखी 200 कोटींच्या बॉण्डद्वारे रस्ते, पाणी, मलनिस्सारण, प्रकाशव्यवस्था या विकासकामांसाठी खर्च करेल.
सिंहस्थाच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पायाभूत सुविधा उभारणे ही जबाबदारी शासनावर आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे होणार असून, त्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी महापालिकेने आता वित्तीय नियोजनाचा मार्ग अवलंबला आहे. कुंभमेळ्यासाठी 25 टक्के वाटा महापालिकेचा असणार आहे. त्यासाठी मनपा निधी उभारून ठेवत आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाशिकमध्ये प्रथमच ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारणी होत आहे.
मनपाकडून उभारण्यात येणार्या 400
कोटींच्या कर्जरोख्यांची प्रक्रिया सुरू आहे. विशेष तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे.
– दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखाधिकारी, मनपा