केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांचे प्रतिपादन
शिलापूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक उत्पादने तपासणी करण्याकरिता बेंगळुरू, हैदराबाद व भोपाळ येथे पाठवली जातात; परंतु वेळ व पैशाची बचत होऊन पश्चिम भारतासाठी येथील लॅब वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. बुधवारी (दि. 10) शिलापूर येथील सीपीआरआय लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज आहिरे, लॅबचे महासंचालक आशिष सिंग उपस्थित होते.
मंत्री खट्टर पुढे म्हणाले की, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू या तपासणी करूनच बाहेर पडतात. त्यासाठी पॉवर सप्लाय चेन असते. काही कमजोरी त्यात राहिली तर मोठी दुर्घटना घडू शकते. भविष्यात शॉर्टसर्किटसारखी मोठी समस्या या टेस्टिंग लॅबमुळे दूर होणार आहे. स्मार्ट मीटरसाठी लोकांचा विश्वास मिळवून महाराष्ट्र राज्याने त्यासाठी 10 टक्के सूट स्मार्ट मीटरवर दिल्याचे सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सीपीआरआय लॅब ही उद्योगविश्वाला दिशा देणारी असून, नाशिकसाठी सुवर्णयोग यामुळे जुळून आलेला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी एका महिन्यात जागा उपलब्ध करून 27 जुलै 2013 ला बैठक घेतली. नाशिक इलेक्ट्रिक हब तयार होऊन शेती उत्पादन व प्रक्रिया उद्योग, रोजगारनिर्मिती यामुळे होणार आहे. परदेशी लॅबच्या तोडीची लॅब येथे स्थापन झाली असून, शैक्षणिक संस्था व त्यातील इंजिनिअर असा कुशल वर्ग इथे आता तयार होईल, अशी अपेक्षा मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात महासंचालक सिंग यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ही प्रयोगशाळा विद्युत उपकरणांच्या उच्च गुणवत्तेसाठी विश्वसनीय आणि वेळेत सेवा प्रदान करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करीत प्रयोगशाळेची माहिती घेतली. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सीपीआरआयचे सहसंचालक के.सुर्यनारायण आदी उपस्थित होते.
प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे दुसरे युनिट
नागपूर येथील औष्णिक संशोधन केंद्रानंतर राज्यात सीपीआरआयने नाशिकमध्ये ही प्रयोगशाळा स्थापित केली आहे. देशाच्या पश्चिम भागातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रदान केलेल्या 100 एकर जागेत ही विस्तारली आहे. ट्रान्सफॉर्मर, एनर्जी मीटर, स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर पॉवर उपकरणांचे उत्पादक येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील.
प्रयोगशाळेची ठळक वैशिष्ट्ये
नाशिकमध्ये स्थित ही सुविधा भारताच्या पश्चिम भागातील उद्योग आणि उपयुक्त सेवा देण्यासाठी निर्माण केलेली आहे. ही प्रयोगशाळा भारत सरकारच्या आत्मनिर्भरच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते. यामुळे जलद उत्पादन विकास आणि बाजारपेठ प्रवेशाला प्रोत्साहन मिळणार आहे. ही सुविधा आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणार आहे. जागतिक स्तरावरील कामगिरी आणि विश्वासार्हता बेंचमार्क सुनिश्चित करणार आहे. उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढवेल. तसेच वीज क्षेत्रातील उत्पादनांची गुणवत्ता वाढवेल.
विजेचे दर कमी होतील : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की, सीपीआरआय लॅब नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाची असून, बाराव्या वित्त आयोगात त्यास मान्यता देण्यात आली. मंत्री भुजबळ यांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला. ही टेस्टिंग लॅब येथे आल्याने ट्रान्सफार्मर ते मीटरपर्यंत सर्व सुविधा येथे मिळतील. टेस्टिंग हब तयार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षांत विजेचे दर स्थिर ठेवून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील. नाशिकमध्ये सात मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक आणू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.