सिन्नर, वावी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरीत गुन्हे केल्याची कबुली
सिन्नर : प्रतिनिधी
फोनवर बोलत रस्त्याने पायी चालणार्या व्यक्तीचा मोबाइल दुचाकीवरून येऊन हिसकावून पळ काढणार्या दोघा संशयितांना सिन्नर पोलिसांनी गजाआड केले आहे. अरबाज सत्तार शहा (19, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) असे पहिल्या दिवशी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संशयित शाहरूख उर्फ चपट्या अफसर शेख (रा. डावखररोड, श्रीरामपूर) हा सोबत असल्याचे अरबाज याने सांगितल्यावर पोलिसांनी शाहरुख याला दुसर्या दिवशी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
सिन्नर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांमध्ये अनेक तालुक्यातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ते पोलिसांना हवे होते. शिर्डी महामार्गावर वावी वेस परिसरात हॉटेल अन्नपूर्णासमोर रविवारी गोरख संजय लासनकर यांचा मोबाइल फोन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेला होता. ते फोनवर बोलत चालले असताना, पाठीमागच्या बाजूने आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाइल फोन हिसकावून लंपास झाले. याप्रकरणी लासनकर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी विशेष पथकास सूचना केल्या होत्या.
त्यानुसार शोधपथकातील अंमलदार समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे नितीन डावखर, आप्पा काकड, प्रशांत सहाणे, हरीश आव्हाड, मनीष मानकर, रवींद्र चिने यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. लासनकर यांचा मोबाईल फोन चोरणारे दोघेजण वावी वेस परिसरात फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली.
त्यावेळी एक संशयित मोटारसायकलवर बसलेला होता. तर दुसरा मोटारसायकलच्या बाजूला उभा होता. मात्र, त्यांनी पोलिसांना ओळखल्यामुळे मोटारसायकलवरील आरोपी फरार झाला व उभ्या असलेल्या आरोपीस पोलिसांनी पकडले.