भांडीबाजार, सराफ बाजारात पाणी
♦ गोदाकाठावरील मंदिरे पाण्याखाली
♦ गोदाकाठच्या व्यावसायिकांची धांदल
♦ रामसेतू पुलाला पाणी
♦ अनेक टपर्या गेल्या वाहून
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात गेल्या चोवीस तासापासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच पावसाचे ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार हजेरी लावल्याने गोदावरीला पूर येऊन पाण्याची पातळी वाढत गेल्याने गोदाकाठच्या व्यावसायिकांची धांदल उडाली.दुकानातील वस्तू काढून नेणे, टपर्या सुरळीतस्थळी हलविण्यासाठी लगबग सुरू होती.
जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आधीच वर्तविली गेली होती, रात्रभर पाऊस बरसल्याने पूर येणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे गोदकाठच्या नागरिक व व्यावसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. बहुतांशी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातील वस्तू काढून नेल्या होत्या. ज्यांना पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल याचा अंदाज नसल्याने ते गाफील राहिले, त्यांची ऐनवेळी धांदल उडाली. व्यावसायिकांच्या टपर्या वैष्णव रोड, वाचनालय रोड, पुरीया रोड, सरदार चौक या भागात सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. गाडगे महाराज पुलाच्या पुढे गौरी पटांगणावरून पाणी शाहीमार्गावरून वाहण्याचा अंदाज लक्षात घेऊन येथील पथमार्गावर अतिक्रमण करून राहणार्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षितस्थळी नेले. त्यानंतर थोड्याच वेळात शाहीमार्ग पाण्याखाली गेला.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर पूर बघण्यासाठी होळकर पूल, गाडगे महाराज पुल, टाळकुटेश्वर पूल येथे बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीत वाहनेही ये-जा करीत असल्याने त्यांना गर्दीतून मार्ग काढणे कठीण जात होते. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पुलावरील वाहतूक ठप्प होत होती. होळकर पुलापासून पुढे पाण्याचा वेग प्रचंड वाढला होता. हे चित्र कन्नमवार पुलापर्यंत होते. कपिलासंगमच्या वळणावर गोदावरीचे रौद्ररूप दिसत होते. कपिला नदी तसेच वाघाडी नदी यांनाही पूर आल्याने यांच्या संगमाच्या भागात पुराचे पाणी तुंबले होते. रविवारी अस्थीविसर्जन व श्राद्धविधीसाठी बाहेर गावरून येणार्या भाविकांची गर्दी होत असते, पुरामुळे त्यांना काठावर श्राद्धविधी करण्याची वेळ आली होती. नवरात्रोत्सवात सांडव्यावरच्या देवी मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांचा हिरमोड होत होता. या मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.
टपर्याही हलवल्या
नाशिकमध्ये आणि प्रामुख्याने गंगापूर धरण भागात शनिवार दि.27 पासून मुसळधार व संततधार पाऊस पडत असल्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा टप्याटप्याने विसर्ग होत होता.त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती .गोदावरी नदीची पातळी वाढल्यामुळे महापूराने सर्वत्र मोठ्या प्रमाणात जलमय परिसर निर्माण झाला होता .येथील सर्व मंदिर पाण्याखाली गेले आहेत.याशिवाय गोदावरी नदी काठावरील लहान मोठ्या व्यवसायिकांची धावपळ व तारांबळ उडाल्याने काही टपर्या महापुरात वाहून जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली.अशावेळी मनपाच्या पंचवटी राष्ट्रीय फेरीवाला धोरण पथकातील कर्मचार्यांनी वेळेत प्रसंगावधान राखून वेळेत नदीच्या काठावरील सर्व व्यवसायिकांना आवश्यक सतर्कतेच्या सुचना दिल्या. याशिवाय पंचवटी राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाच्यावतीने नदीकाठावरील व्यावसायिक टपरीधारक व फेरीवाले यांना सतर्क करून वेळीच टपर्या स्थलांतरित करण्यात आल्या व मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान वाचवण्यात आले आहे.त्याबरोबरच काही टपर्या वाचवत असताना दोन व्यवसायिकांचा जीव वाचवण्यात आला.पुढेही पाण्याचा ओघ वाढल्याने दोन टपर्या पाण्यात वाहून जात असतांना त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले.हे बचाव कार्य मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे सहाय्यक अधीक्षक राजेश सोनवणे,प्रकाश उखाडे,भाऊसाहेब शिंदे,ईश्वर शेंडके,कैलास गायकवाड यांनी सदर मोहीम राबवली.या बचाव कार्य टीमकडून संपूर्ण गोदावरी नदीच्या काठावर रहिवासी व व्यावसायिक यांना आवश्यक त्या सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने रामकुंड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर पूर परिस्थिती बघण्यासाठी आज रविवारच्या दिवशी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
कंटेनर गेला वाहून
या पूरामुळे नाशिकमधील रामतीर्थ गोदावरी समितीच्या गोदा घाटावरचा कंटेनर वाहून गेला. हा कंटेनर आरतीसाठी लागणारी विविध सामग्रीसह ठेवण्यात आला होता. परंतु, पुराच्या जोरदार पाण्याने कंटेनरला नदीत वाहून नेले. परिणामी आरतीसाठी लागणारी सर्व साहित्य पुराच्या पाण्यात हरवली आहे. या घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हा कंटेनर वाहून जातानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे.