नाशिकरोड येथील जाधववाडीत मध्यरात्री हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकरोड येथील जाधववाडीत मध्यरात्री हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : दिलीपराज सोनार

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधववाडी, गोरेवाडी येथील संतोष जाधव यांच्या घराच्या मागे झालेल्या एका भीषण हल्ल्यात कृष्णा नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान गेल्या आठ दिवसात चौथा खून  झाला असुन या वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर भयभीत झाले आहे .

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोईन शेख (रा. उपनगर, नाशिक) याने जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने कृष्णा याच्या पाठीवर वार केला. त्याच्या सोबत असलेल्या चिराग उर्फ मोगली बारसे याने कोयत्याने कृष्णावर वार केला. तसेच प्रकाश उर्फ आशु बारसे याने देखील हल्ला केला, तर यश बारसे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चौघांनी मिळून कृष्णा याला गंभीर जखमी केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कृष्णाची बहीण ज्योती मनोज अहिरे (वय ३२, रा. हिवाळेवाडी, गोरेवाडी) हिने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *