उद्धव ठाकरे : शिंदे, भाजपावर टीकेचे बाण
मुंबई :
जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे, वाघाचं कातड पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण, बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. शेतकरी विचारतोय आम्ही खायचं काय, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही घडली नाही. मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो, हे संकट फार मोठं आहे. पूर्ण मदत करू द्या. मराठवाड्यातील शेतकर्यांना मदत करू. आजचे जे मुख्यमंत्री आहेत, ते आमचं सरकार होतं तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगत होते आणि आता म्हणत आहेत की, ही संज्ञाच नाहीये. मी आजही सांगतोय की, सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केलीच पाहिजे. मी माझ्या सरकारमध्ये कर्जमुक्ती केली होती. बिहारमध्ये शेतकर्यांना देण्यासाठी केंद्राकडे पैसाच पैसा आहे. पण महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी मदतीचे निकष लावले जात आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवतीर्थावर काल पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींपासून तर शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण चालविले.
भाजप म्हणजे अमिबा
भाजप म्हणजे आता अमिबा झाला आहे. वाटेल तसं वेडेवाकडं कसंही पसरतो. कोणाशी पण युती करतो, शरीरात घुसले की बिघवडते. मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे. इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय. मोस्ट पॉप्युलर सीएम. आपल्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये होता. आजच्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, ममता बॅनर्जी आहेत.
आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी
मुंबई महानगरपालिका तुम्ही गहाण ठेवली आहे. बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी तिथं मेहनत घेतली. कोस्टल रोडदेखील आम्हीच केला, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. आमचा हिंदीला विरोध नाही. मात्र, आमच्यावर हिंदी सक्ती करायची नाही. आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत राज ठाकरे हे बरोबर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.