कळवण शेतमजूर बेपत्ता प्रकरणात मोठा ट्विस्ट,

 

कळवण शेतमजूर बेपत्ता प्रकरणात मोठा ट्विस्ट,

बेपत्ता शेतमजूर विठोबा घरातच सापडला

आता दगडफेक करणारे पोलिसांच्या रडारवर

कळवण : प्रतिनिधी
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार (वय 35, रा. कळवण खुर्द) हा अखेर घरातच सुखरूप सापडल्याने कळवण परिसरात खळबळ उडाली आहे. बेपत्ता प्रकरणावरून दोन दिवस संतप्त नातेवाइकांनी केलेले ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आणि दगडफेक यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज सकाळी विठोबा पवार जिवंत सापडल्याने संपूर्ण प्रकरणावर नाट्यमय वळण आले आहे.
घटनेचा तपशील असा की, विठोबा पवार हा शेतकरी बापू त्र्यंंबक शिंदे यांच्या शेतात मजुरीस काम करत होता. त्याने शिंदे यांच्याकडून 35 हजारांची उचल घेतली होती. काही दिवसांपासून तो गावातीलच संजय शेवाळे यांच्याकडे कामास जाऊ लागल्याने शिंदे यांनी त्याच्याकडे उचल रकमेची मागणी केली होती. शुक्रवारी (दि. 3) बापू शिंदे यांनी विठोबाला शेतात कामासाठी नेले होते. परंतु त्या दिवसानंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी अपहरण आणि घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात विठोबाची आई सावित्रीबाई पवार यांनी कळवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बापू शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र रविवारी (दि. 5) सकाळी बेपत्ता समजला जाणारा विठोबा पवार घरातच सुखरूप सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. दोन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या नातेवाइकांनाही याचा धक्का बसला. या घटनेमुळे कळवण शहरात चांगलीच चर्चा रंगली असून, शेतमजुराच्या बेपत्ता प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी विठोबा पवार याची चौकशी सुरू केली असून, तो दोन दिवस कुठे होता आणि या मागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सुरू आहे.

 

खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी
कळवण खुर्द (ता. कळवण) येथील ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन अलीकडील घटनेत दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, विठोबा पवार याच्या मृत्यूच्या अफवांमुळे निष्पाप व्यक्तींवर चुकीचे आरोप करण्यात आले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचा राजकीय पातळीवर गैरवापर केला जात आहे. निष्पक्ष तपासाची गरज आहे. पोलिस प्रशासन व शासनाकडे विनंती केली आहे की, सत्य परिस्थिती तपासून निर्दोषांना न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणातील सूत्रधार कोण आहेत हे शोधणे सुरू असून, दगडफेक व गोंधळ घडवणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही.
-किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक, कळवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *