भाई च्या समर्थकांची पोलिसांनी काढली वरात

नाशिकरोड: विशेष प्रतिनिधी

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश नाना घुमरे (रा. शिवाजीनगर, जेलरोड) हा जेलमधून सुटल्यावर त्याच्या समर्थकांकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे व्हिडिओ तयार करून “भाऊ येतोय लवकरच” अशा कॅप्शनसह रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या यानंतर पोलिसांनी मिरवणूक काढणाऱ्या समर्थकांची धिंड काढल्याने गुन्हेगारांमध्ये वचक बसला आहे.

ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अंमलदार गौरव गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस हवालदार संदिप पवार यांच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेऊन राकेश नाना घुमरे, अनिल नाना घुमरे, शुभम दीपक कुहाडे, सुशांत विकास सोनार, राहुल दिगंबर बोहाडे आणि साहिल राजेश कुलकर्णी या सहा जणांना ताब्यात घेतले. या सर्वांची नाशिक रोड परिसरातून धिंड काढण्यात आली हे सर्व आरोपी नाशिकरोड, शिवाजीनगर आणि जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दाखवलेल्या कणखरतेचा प्रत्यय नागरिकांनाही आला. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशत माजवण्यासाठी ‘रिल्स’ तयार केल्या होत्या, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना पायी फिरवत त्यांची धिंड काढली.

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, निरीक्षक (गुन्हे) संजीव फुलपगारे, सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, तसेच संदिप पवार, विनोद लखन, पंकज कर्पे, संदेश रघतवान, सुनिल गायकवाड, सुरज गवळी, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रविण सांगळे, सतिश मढवई या पोलिसांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *