जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा पिंक रिक्षातून प्रवास

नाशिक : प्रतिनिधी
पर्यावरणप्रेमी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (दि. 6) सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत पिंक ई-रिक्षा लाभार्थी महिलेच्या रिक्षातून प्रवास केला.
जिल्हा प्रशासनात वेगवेगळे उपक्रम राबवत जिल्हा प्रशासन गतिमान व गरजू नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी नवी दिल्ली येथेे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.
याशिवाय एक जिल्हा-एक उत्पादन या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. श्री. शर्मा पर्यावरणबद्दल नेहमीच सजग असतात. चला जाणूया नदीला, वृक्षारोपण, नदी प्रदूषण याबद्दल ते संवेदनशील असतात. अलीकडेच चामर लेणी येथे त्यांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. महिन्यातून किमान एक दिवस वाहन न वापरता ते कार्यालयात येतात. त्यासाठी कधी पायी, तर कधी सायकलचा वापर करतात. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी (दि. 6) त्यांनी वाहनाऐवजी पिंक रिक्षाची निवड केली. राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंक ई-रिक्षा योजना आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साकोरे ही भगिनी चालवत असलेल्या पिंक ई-रिक्षातून निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांनी रिक्षा चालविणार्‍या भगिनीशी संवाद साधला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत ही उद्दिष्टे आहेत. यामुळे नागरिकांत जनजागृती होण्यास मदत हो_ईल.
– जलज शर्मा, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यांचे निवासस्थान ते कार्यालयापर्यंतचा प्रवास माझ्या रिक्षातून केला. हा माझा बहुमान असून, त्यामुळे माझे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.
– वैष्णवी उमाकांत साखरे, पिंक ई-रिक्षा लाभार्थी महिला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *