किरकोळ वादातून अल्पवयीनांकडून महिला व मुलावर हल्ला
वडाळा गाव : प्रतिनिधी
वडाळागाव परिसरात एका किरकोळ वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका महिलेला व तिच्या मुलाला लाकडी दांडा व धारदार शस्त्राने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडाळागाव साठेनगर येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जायबाई ज्ञानेश्वर तीनगोटे, वय ४५, रा. साठेनगर, वडाळागाव यांचा मुलगा आणि दोन विधी संघर्षित बालकांमध्ये खेळताना किरकोळ वाद झाला. तक्रारदार यांच्या मुलास मारहाण करीत असताना तक्रारदार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता
विधी संघर्षित बालक क्रमांक दोन याने फिर्यादी जायबाई यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. तर एक याने फिर्यादींच्या मुलावर काहीतरी धारदार वस्तूने हल्ला करून त्याच्या पोटावर, दोन्ही बाजूंना व पाठीवर जखमा केल्या. या हल्ल्यात तक्रारदार आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाले असून, दोन्ही विधी संघर्षित बालकांन विरुद्ध इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, यांच्या मार्गदर्शनात स पो नि सुनील अंकोलीकर करीत आहेत.